सरकार कोणाचंही असो; गरिबांचं भलं करा; अकोला -मूर्तिजापूर बसमधील मतदार प्रवाशांचा कौल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 12:37 PM2019-04-02T12:37:36+5:302019-04-02T12:38:14+5:30
अकोला : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत कोणाचेही सरकार सत्तेत येऊ द्या; पण सत्तेवर येणाऱ्या सरकारने गरिबांचं भलं केलं पाहिजे, असा कौल अकोला ते मूर्तिजापूर एसटी बसमधील मतदार प्रवाशांनी सोमवारी ‘लोकमत’शी गप्पा मारताना दिला.
अकोला : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत कोणाचेही सरकार सत्तेत येऊ द्या; पण सत्तेवर येणाऱ्या सरकारने गरिबांचं भलं केलं पाहिजे, असा कौल अकोला ते मूर्तिजापूर एसटी बसमधील मतदार प्रवाशांनी सोमवारी ‘लोकमत’शी गप्पा मारताना दिला.
१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला आगारातून एमच १४ बीटी-४८२६ क्रमांकाची अकोला ते मूर्तिजापूर बस निघाली. या बसमध्ये बसलेले ३९ प्रवाशांनी लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे सांगीतले. अकोला ते मूर्तिजापूर ४५ किलोमीटरच्या प्रवासादरम्यान बसमधील प्रवाशांच्या अपेक्षांचा सुरू कमी अधीक प्रमाणात सारखाच होता. सध्या महागाई , बेरोजगारी वाढली असून, शेतीपूरक व्यवसायाचा अभाव आहे. भ्रष्टाचार वाढला असून, पैशाशिवाय कोणतेही काम होत नाही. त्यामुळे निवडून दिलेले सरकार पारदर्शक असले पाहिजे. शेतकरी, शेतमजुरांसह सर्वसामान्यांचे हित साधणारे सरकार सत्तेत आले पाहिजे, असे मत अकोल्यातील बंडू भिरड यांनी व्यक्त केले. निवडणुकीत जनतेने निवडून दिलेल्या सरकारने गोरगरिबांच्या हिताचे काम केले पाहिजे, असे सुकळी येथील निशा काठोळे यांनी सांगितले. निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचे जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष होते. अपेक्षेच्या तुलनेत अकोल्याचा विकास होणे बाकी आहे. त्यामुळे विकासाला गती देणारे आणि सर्वसामान्यांची कामे करणारे सरकार सत्तेत असले पाहिजे, असे मत ईश्वर दुधांडे यांनी व्यक्त केले. तर सर्वसामान्यांची कामे करणारा आणि समस्यांची जाण असणारा लोकप्रतिनिधी निवडून देण्याची आवश्यकता संतोष लोखंडे यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील रस्ते, पिण्याचे पाणी, बेरोजगारी इत्यादी प्रमुख समस्या असून, समस्यांची जाण असणारा आणि त्यासंदर्भात उपाययोजनांसाठी धडपडणारा लोकप्रतिनिधी निवडून दिला पाहिजे, असे मूर्तिजापूरच्या सोनाली तेलंग यांनी सांगितले. देशात चांगले सरकार, काम करणारे असावे, त्यासाठी प्रत्येकाने मतदान करण्याची गरज असल्याचे मत मूर्तिजापूर येथील नितीन कुंडले यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यातील अशा आहेत समस्या !
जिल्ह्यात पिण्याचे पाणी, सिंचनाचा अनुशेष, शेतीपूरक व्यवसाय, रोजगार निर्मितीसाठी औद्योगिकीकरणाचा अभाव इत्यादी प्रमुख समस्या असून, यासंदर्भात निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडून उपाययोजना होणे अपेक्षित असल्याचे मूर्तिजापूर येथील नितीन कुंडले यांनी सांगितले.