..तर नुकसानभरपाई म्हणून पीकविमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम रक्कम

By रवी दामोदर | Published: September 2, 2023 01:28 PM2023-09-02T13:28:02+5:302023-09-02T14:01:47+5:30

पावसाचा खंड; ५२ महसूल मंडळांत सर्व्हे सुरू

..while 25 percent advance amount to crop insured farmers as compensation | ..तर नुकसानभरपाई म्हणून पीकविमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम रक्कम

..तर नुकसानभरपाई म्हणून पीकविमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम रक्कम

googlenewsNext

अकोला : जिल्ह्यात पावसाचा खंड पडल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. तीन ते चार आठवडा पावसाचा खंड तसेच सरासरी उत्पादनाच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असल्यास पीकविमा नुकसानभरपाईपोटी २५ टक्के अग्रीम रक्कम मिळण्याची योजनेत तरतूद आहे. जिल्ह्यातही पावसाने दडी मारली असून, पावसाची ३८ टक्के तूट आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळांमध्ये पिकांच्या सर्वेक्षणास कृषी व महसूल विभागाकडून सुरुवात करण्यात आली आहे. यासंदर्भात दि. ५ सप्टेंबरपर्यंत नुकसानाचा अहवाल शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे. त्यामुळे नुकसानभरपाईपोटी २५ टक्के अग्रीम रक्कम मिळण्याच्या आशा पीकविमाधारक शेतकऱ्यांना आहेत.

   जिल्ह्यात खरीप हंगामातील पिके बहरलेली असताना पावसाने दडी मारल्याने पिकांना मोठा फटका बसणार आहे. सोयाबीनचे पीक फुलधारणा अवस्थेत असून, नितांत गरज असताना पावसाचा खंड आहे. परिणामी, उत्पादनात प्रचंड घट निर्माण होण्याची शक्यता आहे. पीकविमा योजनेतील तरतुदीनुसार, ३ ते ४ आठवड्यांचा पावसाचा खंड तसेच चालू वर्षीच्या अपेक्षित उत्पादनात गत सात वर्षांतील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असल्यास येणाऱ्या पीकविमा नुकसानभरपाईच्या २५ टक्के मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देण्याची कृषी आयुक्तांनी तरतूद केली आहे. सध्या जिल्ह्यातही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पावसाचा ताण बसलेल्या महसूल मंडळात सर्व्हेला सुरुवात करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे देणार अहवाल
जिल्ह्यात सुरुवातील २० महसूल मंडळांत सर्व्हेला सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यातच पावसाचा खंड असून, आखणी ३२ अशा ५२ महसूल मंडळांत पीक नुकसान सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. यासंदर्भात समितीद्वारा शासन निर्देशानुसार दि. ५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

पावसाने दडी मारल्यामुळे झालेल्या संभाव्य नुकसानाच्या सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. महसूल मंडळनिहाय सर्व्हे सुरू असून, दि. ५ सप्टेंबरपर्यंत सर्वेक्षण, पंचनामा करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिली आहे. यंत्रणेकडील नुकसानाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे.
- शंकर किरवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला.

Web Title: ..while 25 percent advance amount to crop insured farmers as compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.