३० हजारांची लाच स्वीकारताना कृषी विभागातील कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2022 07:33 PM2022-04-04T19:33:52+5:302022-04-04T19:34:13+5:30
Bribe Case : ३० हजार रुपये पंचांसमक्ष जप्त करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
अकोला : शासकीय योजना पोकरांतर्गत बियाणे साठवण, गोदाम बांधकामाच्या अनुषंगाने मोका तपासणी करून बांधकामाची पूर्वसंमती मिळवून देण्यासाठी कृषी विभागातील एका कर्मचाऱ्यास तक्रारदाकडून ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाच्या परिसरात दि.४ एप्रिल रोजी रंगेहाथ पकडले. देहूल परशुराम वासनिक (३८), असे लाच स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव असून, तो प्रकल्प विषयतज्ज्ञ प्रापण पदावर कार्यरत आहे.
प्राप्त माहितीनुसार, अकोट तालुक्यातील धनकवाडी येथील तक्रारदारांनी शासकीय योजना पोकराअंतर्गत बियाणे साठवण/गोदाम मिळण्यासाठी अर्ज केला होता. गोदाम बांधकामाच्या अनुषंगाने मोका तपासणी करून बांधकाम पूर्वसंमती मिळवून देण्याकरिता कृषी विभागात प्रकल्प विषयतज्ज्ञ देहूल परशुराम वासनिक याने तक्रारदारकाडे ७० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधत तक्रार दाखल केली होती. पडताळणीदरम्यान ठरल्याप्रमाणे ३० हजार रुपयांची लाच आरोपी देहूल वासनिक याने उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाच्या परिसरात स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचून आरोपीला रंगेहाथ पकडले. तक्रारदाराकडून स्वीकारलेली लाच ३० हजार रुपये पंचांसमक्ष जप्त करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अरुण सावंत अपर पोलीस अधीक्षक, देवीदास घेवारे अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक अकोला उत्तम विठ्ठल नामवाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सचिन सावंत, पो.ना. प्रदीप गावंडे, दिगंबर जाधव, सुनील येलोणे, चालक पो.ना. सलीम खान यांनी केली.