दुकान फोडत असताना पाेलिस आले अन् गेमच फसला! तिघा चोरट्यांना पकडले
By नितिन गव्हाळे | Published: October 10, 2023 10:30 PM2023-10-10T22:30:55+5:302023-10-10T22:31:32+5:30
गस्तीवरील पोलिसांनी केली कारवाई, युवकही मदतीला धावले
नितीन गव्हाळे, अकोला: सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीत जवाहनगर परिसरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एका दुकानात शिरलेल्या तिघांना पोलिस कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या जवानाने परिसरातील युवकांच्या मदतीने रंगेहात अटक केली.
पोलिस कर्मचारी उमेश यादव व होमगार्ड सैनिक राजेश घाटोळे हे गस्तीवर असताना सोमवारी मध्यरात्रीनंतर जवाहरनगर परिसरात त्यांना सौजन्य मार्केटमधील सागर प्रोव्हिजन या दुकानाचे शटर वाकलेल्या स्थितीत दिसले. त्यामुळे ते दुकानाचे दिशेने जात असताना दुकानाजवळ एक दुचाकी उभी दिसली. गाडीजवळ उभे असलेले दोन चोरटे त्यांना पाहून पळून गेले. त्यांना चोरीचा संशय आल्याने सागर प्रोव्हिजन दुकानात जाऊन पाहिले असता, दुकानात त्यांना तीन चोरटे दिसले. त्यापैकी एकाजवळ लोखंडी रॉड व एकाजवळ लाकडी मूठ असलेली लोखंडी हातोडी होती. ते पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून आले. त्यावेळी उमेश यांनी एका जवळील लोखंडी रॉड पकडला व सोबत असलेल्या होमगार्डने हातोडी असणाऱ्या चोरट्यास पकडले. आरोपी तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे उमेश यादव व होमगार्ड सैनिकाने आरोपीला पकडून आरडाओरडा केला. त्यामुळे परिसरातील शुभम हिवराळे, गणेश नाईक या युवकांनी धावत येऊन पोलिस कर्मचाऱ्यांना आरोपीस पकडण्यात मदत केली.
मिरचीपूड टाकून पळण्याचा प्रयत्न
पोलिस कर्मचाऱ्यांनी तीन आरोपींना पकडले. एका आरोपीने त्याच्या खिशातील मिरचीपूड काढून पोलिस कर्मचाऱ्याच्या डोळ्यावर फेकण्याचा प्रयत्न केला. मदतीला आलेल्या मुलांनी आरोपीला पकडले व त्याच्याजवळील मिरचीपूड हिसकावून घेतली.
या आरोपींना अटक
पोलिस कर्मचाऱ्यांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये विनायक महेंद्र येन्नावार (२२, रा. सोपीनाथनगर, डाबकी रोड), चेतन चंदू निवाने (१८, रा. शिवाजीनगर, नवाबपुरा, जुने शहर), गौरव गजानन बोदडे (२६, रा. काटेपूर्णा, नवीन वस्ती) यांचा समावेश आहे. पोलिस कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनला या तिघांविरुद्ध भादंवि कलम ३९९ नुसार गुन्हा दाखल केला.