कोरोनाची भीती कोणाला? कुठेही जा गर्दी कायमच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 10:45 AM2020-07-01T10:45:58+5:302020-07-01T10:46:29+5:30
फिजिकल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा असेच चित्र मंगळवारीही कायमच होते.
अकोला : अकोल्यातील कोरोनाबाधितांची संख्या आणि स्थिती आता संपूर्ण विदर्भात सर्वाधिक चिंताजनक आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतच आहे. दुसरीकडे अकोल्यातील रस्त्यांवर फिरताना कुठेही कोरोनाची भीती नागरिकांना असल्याचे जाणवत नाही. खरेदीसाठी गर्दी, चौकाचौकात दुचाकीवर बसूनच रंगणारे गप्पांचे फड, मास्कचा वापर नाही, फिजिकल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा असेच चित्र मंगळवारीही कायमच होते.
अकोला शहरातील व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला तिलक रोडवरची गर्दी दररोज वाढतीच आहे. सम-विषम नियमाचे कोणतेही पालन या रोडवर होताना दिसले नाही. दोन्ही बाजूंची दुकाने सुरूच होती. काही दुकानांनी अर्धवट शटर ओढून घेतलेले होते. वाहतुकीची शिस्त या रोडवर कधीही दिसत नाही, त्यामुळे वाहनांच्या गर्दीने हा रोड कायमच गजबजलेला होता. या रोडवर फेरफटका मारला तर कोरोनाची भीती कुठेही नसल्याचे स्पष्टपणे जाणवते.
फिरते चहा विक्रेते अन् गप्पांचे फड
चहाची दुकाने, रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी अजूनही परवानगी नाही, त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांना चहाची तलफ भागविण्यासाठी फिरते चहा विक्रेते सेवेत आहेत. आपल्या नेहमीच्याच दुकानांसमोर एखाद्या गाडीवर चहाची कॅन अडकवून चहाची विक्री केली जात आहे. या चहासोबत गप्पांचे फडही रंगतात, त्यावेळी कोणाला मास्कची आठवणही येत नाही.