आर्सेनिक औषधावर नियंत्रण कोणाचे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 09:55 AM2020-06-24T09:55:55+5:302020-06-24T09:59:11+5:30
हे औषध कोणी बनवावे, कोणी विकावे, यावर सध्या तरी कोणाचेच नियंत्रण नाही.
- राजेश शेगोकार
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोनामुळे दुर्लक्षित असलेल्या अनेक गोष्टींना एकदमच झळाळी प्राप्त होऊन त्यांची मागणी वाढली आहे. त्यामध्ये सॅनिटायझर, मास्क यांच्या जोडीला होमिओपॅथी औषधांचाही समावेश आहे. एरव्ही साबुदाण्याच्या गोळ्या म्हणून ज्या पॅथीला हिणवले जात असे त्याच होमिओपॅथीच्या ‘आर्सेनिक अल्बम-३०’ या औषधाला सध्या प्रचंड मागणी आहे; मात्र हे औषध कोणी बनवावे, कोणी विकावे, यावर सध्या तरी कोणाचेच नियंत्रण नाही. त्यामुळे प्रसाद वाटावा असे या औषधीचे वितरण होत आहे.
केंद्रीय आयुष मंत्रालयाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये होमिओपॅथीचा समावेश करून ‘आर्सेनिक अल्बम-३०’ हे औषध रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरते, असे स्पष्ट केल्यामुळे हे औषध चर्चेत आले. आयुष मंत्रालयाची सूचना नागरिकांसह आरोग्य व स्थानिक जिल्हा प्रशासनानेही सुरुवातीच्या काळात फारशी गांभीर्याने घेतली नाही, त्यामुळे केवळ होमिओ फार्मसी आणि डॉक्टरांपर्यंतच या औषधाचे वितरण होत होते. कोरोनाचा प्रसार जसजसा वाढला तसतशी औषधांची गरज भासू लागली. भीतीपोटी, काळजीपोटी सर्वच पॅथींच्या प्रतिबंधात्मक औषधांचा वापर होऊ लागला. त्या औषधांमध्ये ‘आर्सेनिक अल्बम-३०’ हे सर्वात प्रभावी ठरल्याचा दावा करण्यात आल्याने या औषधाची मागणी वाढली आहे.
कार्यकर्ते, ग्रामसेवक, शिक्षकांनीही बनविले औषध
‘आर्सेनिक अल्बम-३०’ हे औषध तयार करण्यसाठी लागणारे ....लिक्वीड थेट वितरकाकडून खरेदी करून कोणीही हे औषध तयार केल्याचे समोर आले आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेत्यांचे समर्थक, ग्रामसेवक, शिक्षक व बेरोजगार तरुणांनीही हे औषध बनवून वितरित केले आहे. औषध देणारा व घेणारा कोणीही औषधीबाबत खातरजमा करण्याचा प्रयत्नही केलेले दिसत नाही.
९० टक्क्यांनी वाढली मागणी
कोरोना संक्रमणाच्या काळात ‘आर्सेनिक अल्बम-३०’ या औषधाची विक्री तब्बल ९० टक्क्यांनी वाढली आहे. ज्या डॉक्टरांकडून ३० एमएल आर्सेनिकची मागणी केली जात होती, ते आता लीटरमध्ये औषध नेत आहेत.
प्रमाण चुकले तर परिणाम चुकतो
एका बॉटलमध्ये साधारणपणे ४८ गोळ्या असतात. या गोळ्यांवर किती एमएल औषध टाकायचे, याचे प्रमाण ठरले आहे. हे प्रमाण चुकले तर औषधाचा योग्य परिणाम होत नाही तसेच औषध बनविणाराच जर कोरोना संक्रमित असेल तर तयार झालेले औषध हे कोरोनाचे संक्रमण अधिक वाढविणारे ठरू शकते.
कोरोना संक्रमणाच्या काळात ‘आर्सेनिक अल्बम-३०’ हे औषध प्रतिबंधात्मक उपायांसाठी उपयुक्त ठरते, असे आयुष मंत्रालयानेच स्पष्ट केल्यामुळे लोकांचा कल होमिओपॅथीकडे वाढलाच आहे; मात्र तज्ज्ञ व्यक्तीकडूनच औषधे घेतली पाहिजेत. कोणीही औषध तयार केले आणि त्याचा योग्य परिणाम झाला नाही तर होमिओपॅथी बदनाम होईल. त्यामुळे अशा वितरणावर नियंत्रण आलेच पाहिजे.
-डॉ. संदीप चव्हाण,
महाराष्ट्र होमिओपॅथीक
डॉक्टर्स संघर्ष समिती सदस्य.