महापौर पदाचा शिलेदार कोण?
By admin | Published: February 25, 2017 02:27 AM2017-02-25T02:27:21+5:302017-02-25T02:28:47+5:30
नाव निश्चित करण्यासाठी भाजपला ७ मार्चपर्यंतची मुदत
अकोला, दि. २४-भारतीय जनता पार्टीला महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता भाजपच्या अंतर्गत वतरुळात महापौरपदासाठी हालचालींना सुरुवात झाली आहे. महापौरपदाच्या निवडीसाठी नियमानुसार ८ मार्च रोजी मनपाच्या मुख्य सभागृहात विशेष सभेचे आयोजन करावे लागणार असल्यामुळे महापौरपदाचा दावेदार निश्चित करण्यासाठी भाजपकडे ७ मार्चपर्यंतची मुदत आहे. त्यामुळे महापौरपदाचा शिलेदार कोण, याकडे संपूर्ण अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.
अकोल्याचे महापौरपद खुला सर्वसाधारण प्रवर्गासाठी निघाले. त्यामुळे महिला किंवा पुरुष अशा दोन्ही व्यक्तींना महापौरपदाचा दावा करता येणार आहे. महापालिकेच्या चौथ्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी उदयास आली. अकोलेकरांनी भाजपच्या पारड्यात ८0 जागांसाठी एक-दोन नव्हे तर तब्बल ४८ जागांचे दान दिले. भाजपसाठी हा ऐतिहासिक विजय मानल्या जात आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करताना आजपर्यंत होणार्या घोडेबाजाराला आपसूकच लगाम बसला. महापौरपदाचे आरक्षण पाहता भाजपमधील प्रभावी उमेदवारांनी महापौरपदासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. अकोला शहरातील विकास कामांचा अनुशेष पूर्ण करण्यासाठी केंद्रासह राज्य शासनाकडून निधी मिळवण्यासाठी लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा तसेच मनपा प्रशासनाकडून होणारी अंमलबजावणी पाहता आगामी दिवसांत विकास कामांना गती येणार असल्याचे चित्र आहे. या सर्व बाबींचा विचार करूनच महापौरपदाचा दावेदार वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ व पक्षाच्या विचारधारेला अनुसरून काम करणारा असावा, यावर भाजपमध्ये काथ्याकू ट सुरू आहे. महापालिकेत भाजपचा कालावधी पाहता आजपर्यंत महापौरपदासाठी पक्षाने महिलांना प्राधान्य दिल्याचे दिसून येते. यावेळी पुरुषांना प्राधान्य दिल्या जाण्याची दाट शक्यता आहे. त्यानुषंगाने खासदार संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर तसेच महानगराध्यक्ष कि शोर पाटील मांगटे यांनी चाचपणी सुरू केल्याची माहिती आहे. ७ मार्चपर्यंत महापौरपदाच्या नावावर पक्षाला शिक्कामोर्तब करावे लागणार असल्यामुळे लाल दिव्याची गाडी कोणाच्या वाटेला येणार, याविषयी अकोलेकरांची उत्सुकता शिगेला ताणली आहे.
यांच्या नावाची चर्चा!
महापौरपदासाठी पक्षात विजय अग्रवाल, हरीश आलिमचंदानी, विजय इंगळे, सारिका जयस्वाल, योगीता पावसाळे, अनिल गरड, मिलिंद राऊत यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. असे असले तरी ऐनवळी समीकरणांमध्ये फेरबदल होऊ शकतात.