रिक्षाचालकांच्या अरेरावीला लगाम घालणार कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:41 AM2021-09-02T04:41:30+5:302021-09-02T04:41:30+5:30
सचिन राऊत अकोला : शहरात रिक्षाचालकांची अरेरावी काही वर्षांमध्ये वाढल्याचे वास्तव आहे. रिक्षा व्यवसायाच्या नावाखाली काही जणांनी प्रवाशांना मारहाण ...
सचिन राऊत
अकोला : शहरात रिक्षाचालकांची अरेरावी काही वर्षांमध्ये वाढल्याचे वास्तव आहे. रिक्षा व्यवसायाच्या नावाखाली काही जणांनी प्रवाशांना मारहाण करून लुटण्याचा उद्योगच सुरू केलेला आहे. काही मोजक्या अरेरावी करणाऱ्या या रिक्षाचालकांमुळे इतर रिक्षा चालक-मालक बदनाम होत आहेत. शहरात काही जणांनी तर टोळ्याच निर्माण केलेल्या आहेत.
एकीकडे दिवसभर राबून प्रामाणिकपणे दोन-चारशे रुपये कमवून सुखाने दोन घास खाणारे रिक्षाचालक आहेत तर दुसरीकडे संध्याकाळी दारू व मौजमस्तीच्या सोयीसाठी प्रवाशांना फसविणारेही आहेत. काही जणांनी तर गुन्हेगारी कृत्यासाठीच रिक्षाचा वापर सुरू केलेला आहे. अकोला येथील एका पोलिसाला वर्षापूर्वी मारहाण करून लुटण्यात आले होते. याप्रकरणी रामदास पेठ पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. सिटी कोतवाली व सिव्हिल लाईन्स पोलिसांनी देखील काही महिन्यांपूर्वी प्रवाशांना लुटणाऱ्या रिक्षाचालक व त्याच्या साथीदारांना अटक केली होती. दरम्यान, प्रवाशांना विश्वास व दिलासा देण्यासाठी या प्रवृत्तींना ठेचणे गरजेचे असल्याचा सूर नागरिकांमधून उमटत आहेत.
जिल्ह्यात दाखल गंभीर गुन्हे
२०१९। ३४
२०२०। २१
२०२१। १२
विनापरवाना रिक्षाचालक एक डोकेदुखी
शहरात निम्म्यापेक्षा जास्त रिक्षाचालकांकडे परवाना नाही. काही रिक्षांची मुदतच संपलेली आहे, तर काही जणांकडे ना बॅच, ना बिल्ला अशी स्थिती आहे. काही वर्षांपूर्वी विनापरवानाधारक रिक्षांवर पोलिसांनी कारवाई केली होती. तेव्हा संघटनांनी आंदोलन केले होते. आज अनेक रिक्षाचालक प्रामाणिकपणे कार्य करतात. प्रवाशांशी सौजन्याने वागतात तर काही जण पुरुषच नाही तर महिलांशीही उद्धटपणाने वागतात, त्यांच्या या कृतीमुळे सर्वच रिक्षाचालक बदनाम होत असून, ही एक डोकेदुखीच झालेली आहे.
या घटनांना जबाबदार कोण?
विद्यार्थिनींची छेड
एका महाविद्यालयाच्या बाहेर काही रिक्षाचालक थांबतात. येथे रिक्षा थांबा नाही, मात्र महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींची छेड काढण्यासाठीच काही मजनू या रिक्षाचालकांजवळ थांबतात. या चौकात पोलिसांनीच काही रिक्षाचालकांना ठोकून पोलीस ठाण्यात नेल्याचेही उदाहरण आहे. महाविद्यालयात जाताना किंवा येताना मुलींवर लक्ष ठेवून इशारे केल्याची उदाहरणे आहेत.
प्रवाशाला मारहाण करून लुटले
सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिक्षाचालकांनी प्रवाशांना रिक्षात बसवून मारहाण व लूटमार केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. रिक्षात त्यांचे सहकारी आधीच बसलेले असतात. सावज शोधून त्यांना आतमध्ये बसविले जाते, नंतर पुढे उतरवून देण्यात येते. शिवर येथील एका व्यक्तीला अशाच पद्धतीने मारहाण करून लुटण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
काय काळजी घेणार?
शक्यतो परवानाधारकाने रिक्षा चालवावी. भाड्याने द्यायची झाली तर संबंधित व्यक्तीकडे बॅच, बिल्ला असेल तरच द्यावी तसेच त्याची वर्तणूक कशी आहे, गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? याची पडताळणी झाली पाहिजे. बॅच, बिल्ला असेल तर आमच्याकडे संबंधित व्यक्तीची माहिती असते. रात्रीच्या वेळीच शक्यतो गुन्ह्यांचे प्रकार घडतात. पोलिसांनी त्यांची तपासणी करावी. आरटीओची मदत लागली तर नक्कीच देऊ.
-समीर ढेमरे
मोटार वाहन निरीक्षक अकोला
शहरात कोणाचीही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. वाहतूक पोलिसांमार्फत अधूनमधून रिक्षांची तपासणी केली जाते. प्रवाशांना लुटणारे तसेच मारहाण करण्याच्या प्रकरणात गुन्हे दाखल करून संबंधितांना अटकही करण्यात आलेली आहे. पोलीस दल याबाबत दक्ष आहे. गुंडगिरीचा काही प्रकार घडल्यास नागरिकांनी न घाबरता पोलिसांत तक्रार द्यावी.
-विलास पाटील, वाहतूक शाखा प्रमुख