संपूर्ण अकोला जिल्हा कोरोनाच्या कक्षेत; दिवसभरात एकाचा मृत्यू; १८ नवे पॉझिटिव्ह, एकूण रुग्ण ४१५
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 07:29 PM2020-05-25T19:29:04+5:302020-05-25T19:32:01+5:30
सोमवार, २५ मे रोजी दिवसभरात एका महिलेचा मृत्यू, तर १८ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली.
अकोला: शहरातील सर्वच प्रभागांमध्ये पाय पसरलेल्या कोरोनाच्या कक्षेत आता संपूर्ण जिल्हा आला असून, आतापर्यंत एकही रुग्ण नसलेल्या अकोट शहरातही कोरोनचा शिरकाव झाला आहे. सोमवार, २५ मे रोजी दिवसभरात एका महिलेचा मृत्यू, तर १८ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यातील आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४१५ झाली आहे. तर मृतकांचा आकडाही २५ झाला आहे. दरम्यान, आणखी २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत १३९ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
मे महिन्याच्या पहिल्या तारखेपासून कोरोनाच्या संक्रमनाने वेग घेतला असून, रविवार, २४ मे रोजी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३९७ वर पोहचली होती. यामध्ये सोमवारी आणखी नवीन १८ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. रविवारी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेकडून एकूण २७७ संदिग्ध रुग्णांची कोरोना चाचणीचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी २५९ अहवाल निगेटिव्ह असून, उर्वरित १८ अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. यामध्ये ११ पुरुष व सात महिला रुग्णांचा समावेश आहे.
सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या ९ रुग्णांपैकी तीन जण हे फिरदौस कॉलनी येथील रहिवासी आहेत. तर अन्य महसूल कॉलनी, अण्णाभाऊ साठे नगर अकोट फैल, देशमुख फैल, अकोट फैल, मोहता मिल नानकनगर, गोकुळ कॉलनी, अकोट येथील रहिवासी असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सायंकाळी पॉझिटीव्ह आलेल्या नऊ रुग्णांपैकी दोन जण हे न्यु राधाकिसन प्लॉट येथील रहिवासी आहेत. तर अन्य रणपिसेनगर, गोरक्षण रोड, पावसाळे ले आऊट कौलखेड रोड, सिंधी कॅम्प, शिवर, बाळापूर व पातुर येथील रहिवासी आहेत. दरम्यान, मोहम्मद अली रोड परिसरातील एका ४० वर्षीय महिलेचा रविावारी उपचार घेताना मृत्यू झाला. या महिलेला शनिवार, १९ मे रोजी दाखल करण्यात आले होते. २३ मे रोजी तिचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कोरानाबाधितांच्या मृत्यूचा आकडाही २५ वर पोहचला आहे. यामध्ये एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केली आहे. आतापर्यंत २५१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, आता १३९ रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत.
रविवारी २२ जणांना ‘डिस्चार्ज’
एकीकडे कोरोनाच्या कचाट्यात सापडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. रविवारी रात्री एकूण २२ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यापैकी तीघांना घरी पाठविण्यात आले. तर उर्वरित १९ जणांना संस्थागत अलगिकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.
प्राप्त अहवाल-२७७
पॉझिटीव्ह-१८
निगेटीव्ह-२५९
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल- ४१५
मयत-२५(२४+१),डिस्चार्ज-२५१
दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१३९