होलसेल औषध व्यावसायिकांचा हात आखडता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 11:28 AM2020-03-30T11:28:49+5:302020-03-30T11:28:58+5:30
औषध देण्यासाठी केवळ दुपारी २ वाजतापर्यंतची वेळ दिल्याने शेकडो रुग्णांना आवश्यक तसेच महत्त्वाची औषधी मिळत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
- सचिन राऊत
अकोला: कोरोनाच्या भीषण संकटामुळे राज्यात संचारबंदी लागू केल्यानंतर अत्यावश्यक सेवेसाठी औषध दुकाने २४ तास उघडे ठेवण्याचा आदेश असतानाही जिल्ह्यातील होलसेल औषध व्यावसायिकांनी किरकोळ औषध व्यावसायिकांना औषध देण्यासाठी केवळ दुपारी २ वाजतापर्यंतची वेळ दिल्याने शेकडो रुग्णांना आवश्यक तसेच महत्त्वाची औषधी मिळत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. होलसेल औषध व्यावसायिकांनी आॅर्डर घेण्यासाठी दुपारपर्यंतच वेळ दिल्याने अन्न व औषध प्रशासनाचे त्यांच्यावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे यावरून दिसून येत आहे.
कोरोना या संसर्गजन्य विषाणूचे गंभीर संकट रोखण्यासाठी आरोग्य आणि औषध विभागावर मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे औषध दुकाने आणि हॉस्पिटल २४ तास उघडे ठेवण्याचा आदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. यासोबतच औषधांची गरज हजारो रुग्णांना असतानाही अशा गंभीर आरोग्याच्या संकटावेळी औषध दुकाने २४ तास सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत; मात्र अकोल्यातील दवा बाजार तसेच होलसेल औषध विक्रेते, किरकोळ औषध विक्रेत्यांची आॅर्डर घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे शेकडो रुग्णांना औषधीच मिळत नसल्याचे वास्तव आहे. अशातच गत दोन दिवसांपासून होलसेल औषध व्यावसायिकांनी किरकोळ व्यावसायिकांच्या आॅर्डर घेण्यासाठी दुपारी २ वाजतापर्यंतची वेळ दिली आहे. या वेळेनंतर किरकोळ औषध व्यावसायिकांना औषधी लागल्यास होलसेल औषध विक्रेते औषध देण्यास असमर्थता दर्शवित आहेत. त्यामुळे किरकोळ औषध विक्रेत्यांकडे येत असलेल्या अनेक रुग्णांना औषधीच मिळत नसल्याचे वास्तव आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे नियंत्रण असलेल्या औषध व्यावसायिकांनी अशा प्रकारची भूमिका घेतल्यानंतरही औषध प्रशासन विभाग मात्र झोपेत असल्याचे दिसून येत आहे.
मुंबईत परवाना निलंबनाची कारवाई
मुंबईत जे औषध व्यावसायिक वेळ ठरवून औषधांची दुकाने सुरू ठेवत आहेत. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत; मात्र अकोल्यातील होलसेल औषध विक्रेते शासनाचा आदेश तुडवित केवळ दुपारी २ वाजतापर्यंत वेळ ठरवून औषध देत असल्याने अत्यावश्यक सेवेत खंड करीत असल्याचे दिसून येत आहे. यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.
जिल्हाधिकारी यांनीच लक्ष घालावे!
किरकोळ औषध व्यावसायिकांना होलसेल औषध व्यावसायिक दुपारी २ वाजतानंतर औषध देत नसल्याने हजारो रुग्णांना त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे किरकोळ औषध दुकानांमध्ये आता औषध नसल्याने तसेच सकाळी ११ ते दुपारी २ याच वेळेत होलसेलर्सकडून औषध मिळत असल्याने अनेक औषध दुकानांमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण होत आहे.
रात्रीच्या रुग्णांचे हाल
खेड्यापाड्यांतून तसेच शहरातील रात्री-बेरात्री इमरजन्सीमध्ये रुग्णालयात दाखल होत असलेल्या रुग्णांना काही औषधी मिळत नसल्याचे दिसून येत आहे. किरकोळ औषध व्यावसायिकांकडे हा पुरवठाच आता योग्य होत नसल्याने रुग्णांचे हाल-बेहाल होत आहेत. औषध प्रशासन विभागाचे अधिकारीही यावर नियंत्रण मिळवित नसल्याने नागरिकांना प्रचंड समस्यांचा सामना करावा लागत आहे.