ठोक भाजी बाजार हलविणार!

By Admin | Published: March 3, 2017 01:57 AM2017-03-03T01:57:51+5:302017-03-03T01:57:51+5:30

होलसेल किराणा बाजाराच्या मागील बाजूस घेतली चार एकर जागा

The wholesale vegetable market will move! | ठोक भाजी बाजार हलविणार!

ठोक भाजी बाजार हलविणार!

googlenewsNext

संजय खांडेकर
अकोला, दि.२ : जनता बाजारातील होलसेल (ठोक) भाजी बाजार बाळापूर मार्गावर हलविण्याची प्रक्रियेला वेग आला असून येथील ३५ अडत व्यापाऱ्यांनी लक्षावधीचा निधी गोळा करून चार एकराचा भूखंड नवीन बाजाराच्या विस्तारीकरणासाठी घेतला आहे.
अकोल्यातील ठोक भाजीबाजार गत अनेक वर्षांपासून शासकीय विश्रामगृहासमोरील जनता बाजारात भरतो. जवळपास चाळीस अडत दुकानदारांनी मिळून येथे महात्मा फुले भाजीपाला अडत दुकानदार असोसिएशन स्थापन केलेली आहे. अकोला, बुलडाणा, वाशिम आणि जवळपासचे शेतकरी फळ- भाजीपाला या ठोक बाजारात आणून विकतात. मध्यरात्रीपासून पहाटे सहा वाजेपर्यंत येथे कायम वर्दळ असते. दररोज कोट्यवधीची उलाढाल या बाजारातून होते.
दररोज अनेक टन कचरा फेकला जात असल्याने महापालिका प्रशासनाला कचरा उचलण्यासाठी विशेष यंत्रणा लावावी लागते. अतिक्रमित केलेल्या जागेवर महिन्याभरापूर्वी महापालिकेने गजराज फिरविल्याने व्यापाऱ्यांचा लाखोंचा व्यवसाय धोक्यात आला. अतिक्रमित जागा हक्काची असू शकत नसल्याने अडत दुकानदारांनी निधी गोळा करून स्वतंत्र्य बाजारपेठ निर्माण करण्यास सुरुवात केली; मात्र त्यात एकमत न झाल्याने असोसिएशनचे अध्यक्ष सज्जाद हुसेन आणि उपाध्यक्ष राजेश दाहे यांच्यात दोन गट पडले. हुसेन यांच्या गटाने आहे त्याच ठिकाणी राहण्यास संमती दर्शविली आहे. तर राजेश दाहे अधिक ३५ सदस्यांनी एकत्रित येऊन भाजीपाल्याची ठोक बाजारपेठ येथून हलविण्यास सुरुवात केली.
याबाबत हुसेन यांना विचारणा केली असता, त्यांनी या बाबीस दुजोरा दिला. बाळापूर मार्गावरील नवीन होलसेल किराणा बाजाराच्या मागील बाजूस खरप रोडवर या सदस्यांनी चार एकरचा मोठा भूखंड विकत घेतला आहे.
या भूखंडावर इमारत बांधून ठोक भाजी बाजार सुरू करण्याचा विचार सुरू आहे. दरम्यान, या बाजारासाठी भाजपच्या खासदार-आमदारांनी निधी द्यावा म्हणून पदाधिकाऱ्यांनी गळ घालणे सुरू आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील बाजारपेठेच्या समर्थनार्थ सहकार्य करण्याचे अश्वासन दिल्याचे समजते. त्यामुळे बाळापूर मार्गावर नवीन होलसेल किराणा बाजाराच्या पाठोपाठ आता ठोक भाजी बाजारही आपले हक्काचे ठिकाण विकसित करीत आहे.

वाहतुकीची कोंडी सुटेल
जनता बाजारातील ठोक भाजी बाजार अकोला शहराच्या बाहेर गेल्यास शहरातील वाहतुकीची कोंडी सुटेल. याचा फायदा सर्वसामान्य अकोलेकरांना होईल. चिल्लर भाजीबाजार तेवढा शहरात राहणार असल्याचे चिन्ह तूर्तास दिसत आहेत.

Web Title: The wholesale vegetable market will move!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.