केंद्रीय गृहमंत्री माेघम बाेलुन काेणाला वाचवतात? - ॲड. प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 10:15 AM2021-04-01T10:15:10+5:302021-04-01T10:15:28+5:30
Prakash Ambedkar : अमित शहा यांनी माेघम न बाेलता स्पष्ट बाेलावे, माेघम बाेलून ते काेणाला वाचवतात? असा प्रश्न ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
अकाेला : वाझे व परमबीर प्रकरणामुळे राजकारण, प्रशासन व पाेलीस यांच्यामधील गुन्हेगारी प्रवृत्ती व या प्रवृत्तीची टाेळी मानसिकता समाेर आली आहेे. हे समाजासाठी घातक आहे. त्यामुळे या प्रकरणात अडचणीत आल्यामुळेच राष्टवादीच्या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री यांची भेट तर घेतली नाही? अमित शहा यांनी माेघम न बाेलता स्पष्ट बाेलावे, माेघम बाेलून ते काेणाला वाचवतात? असा प्रश्न ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.
वाझे व परमबीर प्रकरणात १०० काेटींमध्ये काेणाचा हिसा हाेता, महाविकास आघाडीमधील प्रत्येक घटक पक्षाला किती वाटा दिला जात हाेता, हे समाेर येणे गरजेचे आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्रात भविष्यात काय अराजकता वाढून ठेवली आहे, हे समाेर येते. आज ही टाेळी बारवाल्यायापर्यंत पाेहचली, उद्या ती सामान्यांच्या घरापर्यंत पाेहचायला वेळ लागणार नाही? त्यामुळे या प्रकरणातील सत्य समाेर आले पाहिजे. देशाचे गृहमंत्री शरद पवारांच्या भेटीवर साऱ्याच गाेष्टी सार्वजनिक करायच्या नाहीत असे म्हणतात. त्यामुळे या १०० काेटीमध्ये भाजपाचाही वाटा आहे का, अशी शंका आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. जर वाटा नसेल तर भाजपाने या भेटीमागील सत्य बाहेर सांगितले पाहिजे असे आव्हान त्यांनी दिले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष डाॅ धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हा अध्यक्ष प्रदीप वानखडे आदी उपस्थित हाेते.
चाैकशी समितीची गरज नाही... मुख्यमंत्र्यांनीच भूमिका घ्यावी
१०० काेटींच्या वसुली प्रकरणात चाैकशी समिती नेमण्याचे कारणच नाही? या प्रकरणात परमबीरसिंग यांनी केलेले दावे, रश्मी शुक्ला यांचे फाेन टॅपिंग प्रकरण यामधील सत्य मुख्यमंत्र्यांना माहीत आहेच. त्यांनी या प्रकरणात ठाेस भूमिका घेऊन स्वत:ची प्रतिमा जपावी, अन्यथा मुख्यमंत्री कार्यालयाचाही यामध्ये सहभाग हाेता हे स्पष्ट हाेईल, असा आराेपही ॲड. आंबेडकर यांनी केला.
न्यायालयाने परमबीरसिंग यांची याचिका स्वीकारावी
परमबीरसिंग हे स्वत:हून न्यायालयासमाेर आले हाेते. न्यायालयाने सिंग यांनी केलेल्या चुका व गैरवर्तन प्रतिज्ञापत्रावर घेतले असते तर या प्रकरणातील सत्य अधिक जलदगतीने समाेर आले असते. त्यामुळे न्यायालयाने परमबीरसिंग यांची याचिका स्वीकारण्याची विनंतीही ॲड. आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली.
पंढरपूरची उमेदवारी माेटे यांना घाेषित
पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून वीरप्पा मधुकर मोटे यांच्या नावाची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात पत्रकार परिषदेत केली.