अकरावीसाठी विद्यार्थ्यांचा ओढा ग्रामीण भागात कशासाठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 11:14 AM2021-07-21T11:14:54+5:302021-07-21T11:19:37+5:30
Education News : अनेक विद्यार्थी शहरी महाविद्यालयांमध्ये प्रवेश न घेता ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात.
अकोला : नुकताच इयत्ता दहावीचा निकाल लागला. आता अकरावी प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे. सीईटीच्या माध्यमातून अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. परंतु, अनेक विद्यार्थी शहरी महाविद्यालयांमध्ये प्रवेश न घेता ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात. कोरोनामुळे बाहेरगावांतील आणि परजिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी अकोल्याकडे सध्या पाठ फिरविली आहे. तसेच ग्रामीण भागासह शहरी भागातील विद्यार्थ्यांचा ओढासुद्धा ग्रामीण भागाकडे वळत आहे. दीड वर्षांपासून कोरोनामुळे शाळा-महाविद्यालये बंद आहेत. कोरोनाची झळ शिक्षण क्षेत्रालाही पोहोचली आहे. शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी यायचे. यासोबतच बाहेरगावांतील आणि परजिल्ह्यांतील विद्यार्थीसुद्धा यायचे. परंतु, आता त्याला ब्रेक बसला आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या हजारो जागा रिक्त राहत आहेत. शहरांमधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतल्यास तासिकांना ७५ टक्के हजेरी द्यावी लागते. प्रात्यक्षिके करावी लागतात. गृहपाठ करावा लागतो. ही भानगड नको म्हणून विद्यार्थी ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये पळ काढतात. ग्रामीण भागात एकदा प्रवेश घेतला तर, तासिकांना जाण्याची तसदी नाही. केवळ प्रात्यक्षिक परीक्षांपुरते महाविद्यालयात जायचे ही मानसिकता असल्यामुळे विद्यार्थ्यांचा ग्रामीण भागाकडे कल वाढत आहे.
शहरात अकरावी प्रवेश देणारी कनिष्ठ महाविद्यालये- ५४
एकूण जागा- ८९५५
गेल्या वर्षी किती अर्ज आले- ४७२५
किती जणांनी प्रवेश घेतला- ४४२६
किती जागा रिक्त राहिल्या- ४५२९
अकरावीसाठी गावांत प्रवेश का?
विद्यार्थी अकरावीला सहजतेने प्रवेश घेतात. बारावीचे वर्ष महत्त्वाचे असल्यामुळे वैद्यकीय व अभियांत्रिकीची तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून खासगी शिकवणी वर्गांमध्ये प्रवेश घेतात. त्यामुळे येथील तासिकांना उपस्थित राहता यावे यासाठी विद्यार्थी अकरावीसाठी गावांतील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात. तासिकांना जाण्याची गरज नाही. केवळ प्रात्यक्षिकला कॉलेजमध्ये गेले तर भागते. याउलट शहरी कॉलेजमध्ये ७५ टक्के उपस्थिती, प्रात्यक्षिकांना हजेरी लावावी लागते. त्यामुळे गावांमधील कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थी पसंती देतात.
म्हणून घेतला गावांत प्रवेश
बारावीचे वर्ष महत्त्वाचे असल्याने, नीट, सीईटीची तयारी करावी लागते. शिकवणी वर्ग, अभ्यासासाठी वेळ मिळावा यासाठी ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. शहरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतल्यास काही प्रमाणात का होईना, हजेरी द्यावी लागते.
-श्रेयश गदाधर, विद्यार्थी
गावांतील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला. दररोज जाण्याची गरज नाही. केवळ प्रात्यक्षिकांना बोलाविले जाते. शिकवणी, अभ्यासाला पुरेसा वेळ मिळतो. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे ग्रामीण भागातील महाविद्यालय प्रवेशाच्या दृष्टीने सुरक्षित आहेत.
-गौरव कवडकार, विद्यार्थी
अकरावीसाठी ग्रामीण भागात प्रवेश घेण्याचे प्रमाण एवढे मोठे नाही. कोरोनामुळे बाहेरगाव, परजिल्ह्यातील विद्यार्थी येत नसल्यामुळे शहरातील महाविद्यालयांमधील जागा रिक्त राहत आहेत. त्यासाठी शिक्षण विभागाने अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबवावी.
-प्रा. विवेक डवरे, संस्थाचालक
कोरोनामुळे शिक्षणावर मोठा परिणाम झाला आहे. यापूर्वी परजिल्ह्यासोबतच परगावचे विद्यार्थी शहरात शिक्षणासाठी यायचे. परंतु, कोरोनामुळे विद्यार्थी त्यांच्या गावी, परिसरातच प्रवेश घेत आहेत. तसेच ग्रामीण भागातही विद्यार्थी प्रवेश घेतात. त्यामुळे शहरातील महाविद्यालयांमधील जागा रिक्त राहतात.
-पुष्पा गुलवाडे, संस्थाचालक