शाळा सुरू करण्यासाठी पुढाकार काेण घेणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:24 AM2021-09-07T04:24:02+5:302021-09-07T04:24:02+5:30
महाराष्ट्रात, प्रमुख विरोधी पक्षांनी, मंदिरे उघडावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असे जाहीर केले. सरकार एकीकडे दारूची दुकाने, मॉल इत्यादी ...
महाराष्ट्रात, प्रमुख विरोधी पक्षांनी, मंदिरे उघडावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असे जाहीर केले. सरकार एकीकडे दारूची दुकाने, मॉल इत्यादी उघडण्यास परवानगी देते, परंतु दुसरीकडे मंदिरे बंद का ठेवते यासाठी आंदोलन करण्याची भाषा विरोधी पक्षांनी महाराष्ट्रात केली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पण या मागणीला पूर्णपणे समर्थन केले आहे. कोरोनाच्या तिसरा लाटेची संभावना लक्षात ठेवून सरकारने मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आता श्रावण महिना व त्यानंतर दिवाळीपर्यंत अनेक सण मोठ्या श्रद्धेने व उत्साहाने साजरे केले जातात. त्यामुळे निश्चितपणे मंदिरात भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही व त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. मंदिर हे भाविकांसाठी भक्तिस्थान असते व ते बंद असल्याने भाविकांची नाराजी समजू शकते. नुसते मंदिरेच नव्हे तर सरकारने, शाळा व महाविद्यालयेदेखील बंद ठेवलेली आहेत. त्यामुळे देशाला घडविणाऱ्या पुढील पिढीचे अतोनात नुकसान होताना दिसते. पण शाळा व महाविद्यालये सुरू करावी, अशी मागणी कोणत्याही राजकीय पक्षांनी किंवा विरोधी पक्षांनी केली नाही याचे, पण या ठिकाणी आश्चर्य वाटते. म्हणजे शाळा व महाविद्यालयात शिक्षकवृंद काय दिवे लावतात व ते बंद राहिल्याने काही फरक पडत नाही, असे तर विरोधकांना सुचवायचे नाही ना?
डाॅ. संजय खडक्कार