लसीकरणानंतर ॲण्टीबॉडीज तपासणी करायची कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 10:56 AM2021-07-19T10:56:13+5:302021-07-19T10:56:22+5:30

Why test antibodies after vaccination : विविध लॅबमध्ये दिवसाला सुमारे १० ते १५ जण अशा प्रकारे तपासणी करीत असल्याची माहिती आहे.

Why test antibodies after vaccination? | लसीकरणानंतर ॲण्टीबॉडीज तपासणी करायची कशासाठी?

लसीकरणानंतर ॲण्टीबॉडीज तपासणी करायची कशासाठी?

Next

अकोला : यापूर्वी झालेल्या कोरोनाचा संसर्ग किंवा लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर काही नागरिक आपल्या शरीरामध्ये कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी प्रतिपिंड (अँटीबॉडी) तयार झाले आहेत का, याची तपासणी करीत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. विविध लॅबमध्ये दिवसाला सुमारे १० ते १५ जण अशा प्रकारे तपासणी करीत असल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे त्यांच्या वावरण्यात काहीसा बिनधास्तपणा दिसून येत आहे.

कोरोनातून मुक्त झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरात काही प्रमाणात कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यास अँटीबॉडीज तयार होतात. याशिवाय लसीकरणाच्या दोन्ही डोसनंतर शरीरात अँटीबॉडीज तयार होतात, हे एक प्रकारचे कवच आहे. मात्र, कोरोना प्रतिबंधक उपाययोजना व नियमांचे पालन करणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे. यामध्ये ज्या नागरिकांना संसर्ग झालेला नाही, अशा व्यक्तींद्वारा त्यांना कोरोना तर होऊन गेलेला नाही, या शंकेने अँटीबॉडीजची तपासणी केली जात असल्याची माहिती आहे. शहरातील खासगी पॅथॉलॉजीमध्ये मागील काही दिवसांपासून अशा प्रकारच्या तपासणीसाठी नागरिकांचा कल दिसून येत आहे. प्रत्येक नागरिकांनी अशा प्रकारच्या चाचण्यांची काहीच आवश्यकता नसते. लसीकरणानंतर कोरोनाचा संसर्ग झाल्यास यामध्ये गंभीर होण्याची शक्यता कमी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 

जिल्ह्यात लसीकरण पहिला डोस - ३,७५,२६३

 

दुसरा डोस - १,२०,४१५

उद्दिष्टाच्या तुलनेत प्रमाण -

 

अँटीबॉडीज तपासणीच्या प्रमाणात वाढ

शहरात अँटीबॉडी तपासणीच्या प्रमाणात वाढ झाली का, यासंदर्भात येथील हेडगेवार पॅथॉलॉजीशी संपर्क साधला असता, काही लोक उत्सुकता म्हणून तर काहींना डॉक्टरांनी सांगितले म्हणून अँटीबाॅडीज तपासणीसाठी येत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

तरुणाईसह ज्येष्ठांनाही उत्सुकता

लसीचा दुसरा डोस घेतल्याच्या दोन आठवड्यांत शरीरातील अँटीबॉडीज वाढतात. त्यामुळे अशा प्रकारच्या तपासण्यांची काहीच आवश्यकता नाही. काही जण तर केवळ उत्सुकतेपोटी या चाचण्या करीत आहेत. यामध्ये तरुणांसह ज्येष्ठ नागरिकही आढळून येत आहेत. लसीकरणानंतर संसर्ग जरी झाला तरी गंभीर होण्याची शक्यता कमी असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बाेलताना सांगितले.

कोरोना होऊन गेला काय किंवा झाल्यानंतर शरीरात अँटीबॉडी तयार झाल्यात का यासाठी कोरोनाकाळात सिरोलॉजी सर्वेक्षण करण्यात आले होते. संशोधनाचा भाग म्हणून हे सर्वेक्षण करण्यात आले होते. लस घेतल्यानंतर अशा प्रकारच्या सर्वेक्षणाची गरज नाही. त्यामुळे नागरिकांनी या तपासण्या करण्याऐवजी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नियमित मास्कचा वापर, हात स्वच्छ धुणे तसेच इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचे पालन करावे.

- डॉ. श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी, अकोला

Web Title: Why test antibodies after vaccination?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.