गाव तेथे एसटी फक्त शहरांसाठीच का धावतेय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:14 AM2021-07-18T04:14:18+5:302021-07-18T04:14:18+5:30
कोरोनामुळे बंद असलेली एसटीची प्रवासी सेवा पुन्हा सुरू झाली आहे. हळूहळू प्रवासी संख्याही वाढत आहे. त्यानुसार बसेसच्या फेऱ्या वाढविण्याचे ...
कोरोनामुळे बंद असलेली एसटीची प्रवासी सेवा पुन्हा सुरू झाली आहे. हळूहळू प्रवासी संख्याही वाढत आहे. त्यानुसार बसेसच्या फेऱ्या वाढविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत आगार क्रमांक २ मधून ३० बसेस सोडण्यात येत आहेत. यामध्ये सर्वाधिक लांब पल्ल्याच्या फेऱ्या आहेत. जवळपास ३० टक्के बसेस अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. शाळा बंद व प्रवासी नसल्याने ग्रामीण भागातील बसेसच्या फेऱ्या अद्याप बंद आहेत. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक वाढली आहे. मुख्य मार्गावरील गाव सोडता इतर गावांमध्ये खासगी बसेस, टमटम रिक्षा, काळी पिवळी या वाहनांचा आधार घेतला जात आहे.
आगारातील एकूण बसेस - ५२
कोरोनाआधी दररोज सोडण्यात येणाऱ्या बसेस - ५२
सध्या सुरू असलेल्या फेऱ्या - ८०
खेडेगावांत जाण्यासाठी ‘ऑटो’चा आधार
ज्या गावांमध्ये बसेस नाहीत किंवा कमी आहेत अशा ठिकाणीही ऑटो, काळीपिवळी, खासगी बसेस सुरू झाल्या आहेत. प्रवासीही या वाहनांनी प्रवास करत आहेत. सिसा, जऊळका या आडरस्त्यावरील गावांमध्ये खासगी वाहनांद्वारे प्रवासी वाहतूक होत आहे. ही वाहनेही गच्च भरून जात आहेत.
११ हजार कि.मी.चा प्रवास, पण फक्त शहरांचाच!
जिल्ह्यातील मुख्य मार्गावरील गावांना बसेसना थांबा देण्यात आला आहे; परंतु ग्रामीण भागात मुक्कामी राहणाऱ्या बसेस सुरू झाल्या नाहीत. केवळ शहरामध्ये जाणाऱ्या या बसेस दररोज ११ हजार किमीची प्रवास करीत आहेत. या माध्यमातून दररोज २ लाख ७५ हजार रुपयांच्या जवळपास उत्पन्न प्राप्त होत आहे.
खेडेगावांवरच अन्याय का?
कोरोनाकाळाआधी गावात बसफेरी व्यवस्थित सुरू होती; परंतु कोरोनाकाळापासून बसफेरी बंद आहे. शहरात जाण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. एखाद्या वेळेस हे वाहनही मिळत नाही.
- श्रीकृष्ण इंगळे, पारस
जिल्ह्याच्या ठिकाणाहून एसटी बसद्वारे दळणवळणासाठी सोयीस्कर प्रवास होता; परंतु कोरोनामुळे बसफेऱ्या बंद आहेत. त्यामुळे खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. हे सामान्य नागरिकाला आता परवडत नाही. आधीप्रमाणे बस येणे सुरू करून प्रशासनाने सहकार्य करावे.
- राजेश हरणे, वणी रंभापूर
या गावांना बस कधी सुरू होणार?
शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांची शहरात ये-जा बंद आहे. खेड्यापाड्यातील प्रवासी संख्याही कमी आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बसेस बंद आहेत. यामध्ये पातूर नंदापूर, पारस, खेट्री, जऊळका, धामणासह मोठ्या प्रमाणात गावांमध्ये बसेस बंद आहेत. त्यामुळे या बसेस कधी सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.