अकोल्यात विधवा भगिनींनी केले वटपौर्णिमा पुजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2022 10:49 AM2022-06-15T10:49:36+5:302022-06-15T10:50:18+5:30
Akola News : स्वामिनी विधवा विकास मंडळ प्रवाहाविरुद्ध लढा देत गत बारा वर्षांपासून विधवा वटपौर्णिमा पूजन घेत आहे.
अकोला : समाजातील अनिष्ठ रूढी-परंपरांना झुगारत स्वामिनी विधवा विकास मंडळाच्या महिलांनी मंगळवारी वटपौर्णिमा साजरी करीत वडाच्या झाडाचे पूजन केले.
घरातून आणि समाजातून विधवांना अनेक बंधनांना आजही सामोरे जावे लागते. विधवा वटपौर्णिमा पूजन समाजात अमान्य असल्याने विधवा महिला वट पूजनासाठी पुढाकार घेत नाहीत किंवा त्यांना घेऊ दिला जात नाही. अशा गंभीर परिस्थितीतही वीरस्त्री स्व. लताताई देशमुख प्रेरित स्वामिनी विधवा विकास मंडळ प्रवाहाविरुद्ध लढा देत गत बारा वर्षांपासून विधवा वटपौर्णिमा पूजन घेत आहे. विधवा सन्मानार्थ झालेल्या वट पूजनाकरिता स्वामिनीच्या सचिव सुनीता डाबेराव व जिल्हाध्यक्षा साधना पाटील यांच्या नेतृत्वात रेखाताई नकासकर, कविता तायडे, शीला इवरकर, मीरा वानखडे, सुनीता टाले-पाटील, चेतना गोहेल, स्मिता जंगले, शोभा काहाळे, जयश्री गायकवाड, वर्षा गावंडे, आरती देशमुख, दीपाली देशपांडे, सपना ताथोड या महिलांनी पुढाकार घेत वटपौर्णिमा पूजन केले. चौकटबद्ध समाजातून प्रतिसाद नसतानाही अनिष्ठ सामाजिक बंधनांना झुगारून स्वामिनी संघटना करीत असलेल्या समाज सुधारणेबाबत उपस्थित सधवा महिलांनी भरभरून कौतुक केले. यावेळी विधवा महिलांनी आपले मनोगत व्यक्त करून स्वामिनी संघटनेने समाजाकडे लक्ष न देता परंपरा कायम ठेवावी आणि शासनाकडे पाठपुरावा करावा, असा आग्रह धरला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.