पोलीस अधिकाऱ्याकडून पैशासाठी पत्नीचा छळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 11:55 AM2020-03-02T11:55:10+5:302020-03-02T11:55:17+5:30
रविवारी त्यांच्याविरुद्ध जळगाव येथील जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : चांगल्या पोलीस ठाण्यात, चांगल्या पदावर बदली व्हावी, यासाठी लागणारे १५ लाख रुपये माहेरहून आणावे म्हणून एका पोलीस अधिकाºयानेच पत्नीचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. किशोर वानखेडे असे या पोलीस अधिकाºयाचे नाव असून, ते डाबकी रोड पोलीस ठाण्यात सहायक निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. रविवारी त्यांच्याविरुद्ध जळगाव येथील जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
योगिता यांच्या तक्रारीनुसार, त्या मूळ नाशिक येथील सिडको चाणक्य नगर येथील रहिवासी असून, २०११ मध्ये त्यांचा विवाह अमळनेर येथील किशोर यांच्यासोबत झाला. लग्नाच्या वेळी योगिता यांच्या कुटुंबीयांनी ८ लाख २५ हजार रुपये हुंडा व लग्न असा एकूण १५ लाख रुपयांचा खर्च केला. लग्नानंतर पतीची पहिली नेमणूक पुणे येथे झाली. त्यानंतर नाशिक, बुलडाणा जिल्ह्यात त्यांची बदली झाली. दरम्यानच्या काळात योगिता यांना एक मुलगी व मुलगा झाला. अकोल्यातील डाबकी रोड पोलीस ठाण्यात त्यांची बदली झाल्यानंतर कार्यालयीन त्रास होऊ लागला. पोलीस ठाण्यात त्रास होत असल्याने पती किशोर हे योगिता यांना त्रास देऊ लागले. बदलीसाठी माहेरहून १५ लाख रुपये घेऊन ये, यासाठी मारहाण व शिवीगाळ करायचे. या त्रासाला कंटाळून योगिता या आजी व दोन्ही मुलांसह जळगावात विभक्त राहत आहेत. वेगळे निघाल्यावर पतीने योगिताचे २२ तोळे सोन्याचे दागिनेही काढून घेतले. तुला सोने देणार नाही, तुला जे करायचे ते कर, अशी धमकी दिली होती. या मानसिक तसेच शारीरिक त्रासाला कंटाळून विवाहितेने रविवारी जळगाव येथील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून किशोर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.