वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:31 AM2021-05-05T04:31:18+5:302021-05-05T04:31:18+5:30
अकोला : उन्हाच्या वाढत्या चटक्याने परिसरातील जलस्रोत झपाट्याने खाली जात आहेत. नदी-नाले आणि तलावातील जलसाठा झपाट्याने कमी झाला आहे. ...
अकोला : उन्हाच्या वाढत्या चटक्याने परिसरातील जलस्रोत झपाट्याने खाली जात आहेत. नदी-नाले आणि तलावातील जलसाठा झपाट्याने कमी झाला आहे. यामुळे विहिरीची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खाली गेली आहे. याचा फटका सिंचनाला बसला आहे. तसेच वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होत आहे.
-------------------------------------------------
नागरिक बिनधास्त; धोका वाढला!
अकोट : संचारबंदी लागू केल्यानंतरही बाजारातील गर्दी कमी झाली नाही. यामुळे पोलीस विभागाने शहरात मुख्य चौकांमध्ये बंदोबस्त वाढविला आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तरीही, काही नागरिक बिनधास्त असून, विनाकारण फिरत असल्याचे चित्र आहे.
--------------------------------------
उन्हाचा पारा वाढला; शेतीकामे प्रभावित
बाळापूर : जिल्ह्याचा उन्हाचा पारा चांगलाच वर चढला आहे. मंगळवारी तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. वाढत्या तापमानाने शेतशिवारातील कामे मंदावली आहेत. भाजीपाला पिकाला याचा मोठा फटका बसला आहे.
-----------------------------------------------------
बार्शीटाकळी येथे सुविधांचा अभाव
बार्शीटाकळी : शहरालगत बाहेरगावाहून आलेल्या मजुरांच्या अनेक झोपड्या आहेत. मात्र, येथील नागरिक पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. अनेक वर्षांपासून येथे आवश्यक प्रमाणात सोयीसुविधा अद्यापही पोहोचल्या नाहीत.
-------------------------------------------------
डुकरांचा हैदोस; खरपवासी त्रस्त!
अकोला : गेल्या काही दिवसांपासून शहरातील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये खरप बु. परिसरात डुकरांचा हैदोस प्रचंड वाढला आहे. मात्र, पालिकेच्या वतीने डुकरांच्या बंदोबस्ताकरिता काही महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आलेली मोहीम थंड बस्त्यात असल्याचे दिसून येते. पालिका प्रशासनाचे डुकरांच्या हैदोसाकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.
---------------------------------------------
विनाविमा वाहनांवर कारवाईच नाही
पातूर : कोणतेही वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनाचा विमा काढणे बंधनकारक आहे. वाहनाचा विमा असल्यास अपघातानंतर आर्थिक मदत मिळण्यास वाव असतो. मात्र, वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून वाहन खरेदी सुरू असल्याने रस्त्यावर लाखो वाहने विम्याशिवाय धावत आहेत.
-------------------------------------------------
रोहित्र पेट्या उघड्या; अपघाताची शक्यता!
पातूर : तालुक्यातील अनेक ठिकाणी विद्युत कंपनीचे डीपी खुल्या अवस्थेत पडून आहेत. विद्युतप्रवाहाचा पुरवठा या उघड्या डीपीमधून होत आहे. त्यामुळे त्यापासून केव्हाही मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यातील पिंपळखुटा येथे रोहित्राने पेट घेतल्याची नुकतीच घटना घडली आहे.
-----------------------------------------
टरबूज उत्पादक शेतकरी संकटात
बाळापूर : यावर्षी पाण्याची मुबलक सोय असल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी बागायती क्षेत्रावर टरबुजाची पेरणी केली. सध्या टरबुज विक्रीला आले आहे. संचारबंदीमुळे बाजार बंद असल्याने शेतमाल पडून असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.