वन्य जीवप्रेमी संघटना एकवटल्या, रेल्वे विस्तारीकरणाचा मुद्दा तापला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 06:39 AM2018-06-25T06:39:10+5:302018-06-25T06:39:13+5:30
व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रातील रेल्वे विस्तारीकरणाला वन्य जीवप्रेमींचा विरोध
अकोट : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर एरियात (गाभा क्षेत्र) होणाऱ्या अकोला-खंडवा रेल्वे विस्तारीकरणाला वन्य जीवप्रेमी संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. सदर रेल्वे गाभा क्षेत्रातून न जाऊ देता बाहेरील पर्यायी मार्ग देण्याची मागणी करण्यात आली आहे. अकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात २४ जून रोजी वन्य जीवप्रेमी संघटनांची बैठक पार पडली. या बैठकीला अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ आणि नागपूर येथील वन्य जीवप्रेमी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिल्ली येथील एका बैठकीत अकोला-खंडवा रेल्वेच्या विस्तारीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. परंतु, ही मंजुरी वन्य प्राणी, वन्य जीवांच्या मुळावर उठत असून, त्यामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन विदर्भातील वन्य जीवप्रेमी संघटनांनी रविवारी तातडीने अकोट येथे बैठक बोलविली होती. या बैठकीत शासनाच्या या निर्णयावर तीव्र आक्षेप घेण्यात आले. वाघांच्या अधिवास क्षेत्रातून या रेल्वेचे विस्तारीकरण हे वन्य प्राण्यांसाठी अतिशय घातक असून, त्यामुळे वन संपदाही धोक्यात येणार आहे, असे मत यावेळी वन्य जीवप्रेमींनी व्यक्त केले. विस्तारीकरणासाठी वने, वन्य जीव आणि पर्यावरण या तिन्ही विभागाची मंजुरी न घेता नियमांना बगल देण्यात आली आहे, अशी भावना अॅड. मनीष जेस्वानी यांनी व्यक्त केली. सद्यस्थितीत प्रस्तावित रेल्वे विस्तारीकरणामुळे वन्य प्राणी आणि वन्य जीवांचे अपघात वाढतील, तस्करीला प्रोत्साहन मिळेल. ही बाब लक्षात घेऊन या निर्णयात बदल करून सदर रेल्वे बाहेरील मार्गाने नेण्यात यावी, असे मत अमरावतीचे मानद वन्य जीव रक्षक तथा राज्य जैवविविधता मंडळचे सदस्य डॉ. जयंत वडतकर यांनी व्यक्त केले. रेल्वे विस्तारीकरणामध्ये सद्य स्थितीत केवळ नऊ गावांतील लोकांना फायदा होईल. परंतु, जंगलाच्या बाहेरून रेल्वे नेल्यास ५० ते ६० गावांतील लोकांना उपयोग होईल, शिवाय दळणवळणाची सुविधा मार्गी लागून शेतातील माल दुसºया राज्यात पाठविता येईल. मोठ्या प्रमाणात युवकांना रोजगार निर्माण होईल, अशी भावना निसर्ग कट्टा अकोलाचे अमोल सावंत यांनी व्यक्त केली.
प्रा. इंद्रप्रताप ठाकरे यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे रेल्वे विस्तारीकरण मार्गावरील धोके आणि त्यावरील उपाययोजना उपस्थित वन्य जीवप्रेमींना सादरीकरण केले. या बैठकीला प्रामुख्याने आवुल अकोट, संघर्ष पर्यावरण मित्र मंडळ अकोट, सातपुडा फाउंडेशन नागपूर, वेक्स अमरावती, निसर्ग कट्टा अकोला, कार्स अमरावती, आधार फाउंडेशन अकोला, यूथ फॉर नेचर कंझर्वेशन अमरावती, सृष्टी पर्यावरण मंडळ नागपूर, वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन संस्था वाशिम, सृष्टी वैभव व परिस संस्था अकोला यांच्यासह विदर्भातील अनेक वन्य जीवप्रेमी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. संरक्षित वन क्षेत्राच्या बाहेरुन प्रस्तावित विस्तारित रेल्वे मार्गाच्या क्षेत्रातील गावांमध्ये जनजागृती तसेच संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना प्रस्तावित मार्गाचे उपयुक्तता निदर्शनास आणून दिली जाणार आहे.
या बैठकीला प्रामुख्याने अकोला येथील मानद वन्य जीव रक्षक बाळ काळणे, अमरावतीचे मानद वन्य जीव रक्षक विशाल बनसोड, महेंद्र तरडेजा, संदीप सरडे, देवेंद्र तेलकर, मिलिंद सावदेकर, उदयन पाटील, अनिरुद्ध कविश्वर, चेतन भारती, अजय देशमुख, म्हैसने गुरूजी, अॅड. विजय चव्हाण, रवी ढोंडगे, सतीश देशमुख, संतोष राऊत, तुषार फुंडकर, धनंजय भांबुरकर, मुकेश चौधरी, शिवा इंगळे, अंगुल खांडेकर यांच्यासह अनेक वन्य जीवप्रेमी उपस्थित होते.