पश्चिम वऱ्हाडातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समीकरणे बदलणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 04:21 PM2019-11-29T16:21:19+5:302019-11-29T16:21:25+5:30
अकोल्यात जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, काही दिवसांत महाविकास आघाडीच्या निमित्ताने नव्याने समीकरणे ठरण्याची चिन्हे आहेत.
- राजेश शेगोकार
अकोला: शिवसेनेच्या नेतृत्वात काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेसची महाराष्ट्र विकास आघाडी राज्यात सत्तेत आल्यामुळे नवी सत्ता समीकरणे उदयास आली आहेत. याचे पडसाद जिल्हा व स्थानिक स्तरावरील सत्ताकेंद्रामध्येही पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजप, शिवसेना युती संपुष्टात आल्याने ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील या दोन पक्षांनी मिळून सत्ता मिळविली आहे, तेथे सत्ता बदल अपेक्षित असून, पश्चिम वºहाडात सर्वाधिक उलथापालथ बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात होण्याची शक्यता आहे. अकोल्यात जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, काही दिवसांत महाविकास आघाडीच्या निमित्ताने नव्याने समीकरणे ठरण्याची चिन्हे आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात भाजपा, शिवसेनेची ताकद समसमान आहे. येथे घाटाखाली भाजपा तर घाटावर शिवसेनेचे प्राबल्य आहे. सध्या भाजपाचे तीन, सेनेचे दोन व काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेसचे प्रत्येकी एक आमदार असून, जिल्हा परिषदेत भाजपा अन् राष्टÑवादीची साथसंगत आहे. येथे जिल्हा परिषद भाजपाच्या उमा तायडे यांच्याकडे तर उपाध्यक्षपद हे राष्ट्रवादीच्या मंगला रायपुरे यांच्याकडे आहे. भाजपाचे २४ व राष्टÑवादीचे १० असे सत्ता समीकरण येथे आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते दिवंगत भााऊसाहेब फुंडकर यांच्या पुढाकारातून व राष्टÑवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या संमतीतून ही नवी युती अस्तित्वात आली होती. विशेष म्हणजे, सेनेचेही १० सदस्य असताना भाजपा-सेना एकत्र आली नव्हती. आता नव्या सत्ता समीकरणांमुळे येथे बदल अपेक्षित आहे. काँग्रेसचे १४, राष्टÑवादीचे १० व सेनेचे १० असे समीकरण जुळले तर बुलडाण्याच्या मिनी मंत्रालयातून भाजपाची सत्ता हद्दपार होऊ शकते. जिल्हा परिषदेप्रमाणेच बुलडाण्यातील खामगाव, जळगाव, शेगाव, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, जळगाव जामोद नगर परिषदेत भाजप-सेनेची संयुक्त सत्ता आहे, तसेच दोन नगरपंचायतींमध्ये भाजप-शिवसेना एकत्रित सत्तेत आहेत. त्यामुळे येथे युतीधर्म संकटात असून, येथील सत्तेमध्ये परिवर्तन अपेक्षित आहे.
वाशिम जिल्ह्यात वाशिम व मालेगाव येथील नगरपालिकेत भाजप-शिवसेना संयुक्तपणे सत्तेत आहे. त्यामुळे या दोन नगरपालिकांमध्ये सत्ता बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. अकोल्यात मात्र एकाही सत्ता केंद्रामध्ये भाजप, शिवसेना सोबत नाहीत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्ता केंद्रात बदल नसला तरी भाजपाचे प्राबल्य असलेल्या अकोल्यात आता विधान परिषदेच्या दोन व विधानसभेतील एका आमदाराच्या भरवशावर शिवसेना वरचढ ठरण्याचा निश्चितच प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, अकोला व वाशिममध्ये जिल्हा परिषद निवडणुकीचे पडघम सुरू झाले आहेत. वाशिममध्ये ५२ तर अकोल्यात ५३ जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांसाठी जानेवारीमध्ये निवडणूक होणार असून, नव्याने उदयास आलेल्या महाविकास आघाडीने ही निवडणूक एकत्र लढविण्याचा निर्णय घेतल्यास नव्याने समीकरणे तयार होतील. ही आघाडी एकत्रित लढल्यास शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही राजकीय पक्षांमधून कुठल्याही एकाच उमेदवारास तिकीट मिळून नाराजी नाट्यदेखील उफाळून येऊ शकते, असे संकेत राजकीय गोटातून वर्तविण्यात येत आहेत. त्यामुळे महाआघाडीची स्थानिक स्तरावरील वाटचाल कशी ठरते, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.