अनुदानित बियाणे मला मिळणार का रे भाऊ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:19 AM2021-05-26T04:19:40+5:302021-05-26T04:19:40+5:30
यंदा सोयाबीनला चांगला दर मिळाल्याने बियाणांचे दरही वाढले आहे; मात्र, महाबीजने बियाणांचे दर कायम ठेवले असून, जिल्ह्यात महाबीज बियाणांसाठी ...
यंदा सोयाबीनला चांगला दर मिळाल्याने बियाणांचे दरही वाढले आहे; मात्र, महाबीजने बियाणांचे दर कायम ठेवले असून, जिल्ह्यात महाबीज बियाणांसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलमार्फत अर्ज करून अनुदानित बियाणे मिळणार आहे. शेतकऱ्याची निवड लॉटरी पद्धतीने होणार आहे. पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला एक एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान दिले जाणार आहे. सोयाबीन, ज्वारी, बाजरी, कापूस व मका पिकांमध्ये मिनी कीट कडधान्यांचे आंतरपीक घेणे अनिवार्य आहे. सोयाबीन बियाणांचे दर वाढल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणांसाठी अर्ज केले आहेत; परंतु जिल्ह्यात अनुदानावर केवळ २४०० क्विंटल सोयाबीनचे बियाणे वाटप होणार आहे. प्रमाणित बियाण्यांसाठी एका शेतकऱ्याला दोन हेक्टर मर्यादेत लाभ देय राहणार आहे. कमी प्रमाणात बियाणे उपलब्ध असल्याने लाभाची शक्यता कमीच शेतकऱ्यांना दिसून येत आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक राहणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.
जिल्ह्यातून ३३ हजार अर्ज
अनुदानित बियाणांसाठी महाडीबीटी पोर्टलवर जिल्ह्यातून ३३ हजार १७० अर्ज प्राप्त झाले आहेत.
महाडीबीटी पोर्टलवर बियाणे वितरणासाठी तब्बल २४ हजार १८७ अर्ज प्राप्त झाले आहेत, तर प्रात्यक्षिकासाठी ४ हजार १३८ व आंतरपीक प्रात्यक्षिकासाठी ४ हजार २८० अर्ज मिळाले.
मिनीकिटसाठी ५६५ अर्ज प्राप्त झाले आहेत. लवकरच लॉटरी पद्धतीने निवड होणार आहे.
कोणत्या योजनेसाठी किती अर्ज?
यांत्रिकीकरण १३,९९९
सिंचन १०,१८४
फलोत्पादन ७,२०७
सर्वाधिक अर्ज यांत्रिक शेतीसाठी
महाडीबीटी पोर्टलवरून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे. शेतकरी कोणत्याही वेळी, कुठूनही आपले सरकार महाडीबीटीच्या पोटर्लवरून नोंदी करून राज्य आणि केंद्र पुरुस्कृत कृषी योजनेसाठी अर्ज करू शकतात. जिल्ह्यातून यांत्रिकीकरण, सिंचन, फलोत्पादनाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये यांत्रिक शेतीसाठी सर्वाधिक अर्ज आले आहेत. काही शेतकऱ्यांची निवडही झाली आहे.
एसएमएस आला तर..
अनुदानित बियाणांसाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होणार आहे. यामध्ये त्यांना कोणत्या कृषी सेवा केंद्रातून बियाणे घेता येईल, याबाबत कळविण्यात येणार आहे. त्यानंतर त्या शेतकऱ्यांना सांगितलेल्या कृषी सेवा केंद्रातून बियाणे घ्यावे लागणार आहे.
एसएमएस आला तरच मिळणार अनुदानित बियाणे
महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड होणार आहे.
लॉटरीमध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होतील.
ज्या शेतकऱ्यांना एसएमएस आला, त्या शेतकऱ्यांनाच अनुदानित बियाणे मिळणार आहे.
अर्ज केलेले शेतकरी म्हणतात...
यावर्षी सोयाबीन बियाण्यांची किमत वाढली आहे. कंपनीची एक बॅग ३४०० रुपयांना मिळत आहे. परंतु, या किमतीमध्ये बियाणे घेऊन लागवड करणे खर्चिक आहे. याकरिता अनुदानित बियाण्यांसाठी महाडीबीटी पोर्टलमार्फत अर्ज केला आहे. यामध्ये निवड झाल्यास काही प्रमाणात दिलासा मिळेल. बियाण्यांसाठी होणारा वाढीव खर्च कमी होईल. बियाणे कमी असल्याने नंबर लागतो की नाही सांगता येत नाही.
- राहुल देवर, वरूळ नेमतापूर
गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे लागवडीसाठी लागलेला खर्चही निघाला नाही. यंदाही बियाणे महाग आहे. त्यामुळे लागवड खर्च वाढणार आहे. सोयाबीन पेरणीसाठी महाडीबीटी पोर्टलमार्फत अर्ज केला आहे. अनुदानित बियाणे मिळतील अशी आशा आहे. हे बियाणे न मिळाल्यास खासगी कंपनीचे महाग बियाणे विकत घेण्याची वेळ येईल.
- राजू गावंडे, बोंदरखेड