२ जुलैचा नियमबाह्य ठराव मंजूर होणार का; आज मनपाची महासभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 10:41 AM2020-09-30T10:41:59+5:302020-09-30T10:42:17+5:30
नियमबाह्य ठरावांचे इतिवृत्त विरोधी पक्ष शिवसेना मंजूर होऊ देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अकोला : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात उद्या सकाळी आयोजन करण्यात आले आहे. यावेळी २ जुलै रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेतील नियमबाह्य ठरावांचे इतिवृत्त विरोधी पक्ष शिवसेना मंजूर होऊ देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात २ जुलै रोजी मनपाची सर्वसाधारण सभा पार पडली होती. त्यावेळी विरोधी पक्ष शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी गदारोळ घातल्यामुळे विषयसूचीवरील केवळ सहा ते सात विषयांना महापौर अर्चना मसने यांनी घाईघाईत मंजुरी दिली होती. त्यानंतर मात्र शहरातील विकास कामांसाठी शासनाने निधीची तरतूद केल्यास मनपाच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी क्रमप्राप्त असल्याचा ठराव उजेडात आला होता. या नियमबाह्य ठरावावर शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी तीव्र आक्षेप नोंदवत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्याकडे तक्रार केली. शिवसेनेची तक्रार लक्षात घेता मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी अद्यापही २ जुलै रोजीच्या सभेतील नियमबाह्य ठराव विखंडनासाठी शासनाकडे पाठविला नाही. अशा स्थितीमध्ये उद्या बुधवारी आयोजित सर्वसाधारण सभेत मागील सभेचे इतिवृत्त मंजूर केले जाणार आहे. त्यामध्ये सदर नियमबाह्य ठरावांचा समावेशसुद्धा असल्याची माहिती आहे.
शिवसेनेला नामोहरम करण्याचा प्रयत्न
राज्य शासनाने मंजूर केलेल्या १५ कोटींच्या निधीवरून सत्ताधारी भाजप व विरोधी पक्ष शिवसेनेमध्ये महाभारत रंगले आहे. प्रशासनाच्या खांद्यावरून सेनेवर निशाणा साधण्यात सत्तापक्षाकडून कोणतीही कुचराई केली जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच १५ कोटींच्या कामांना नाहरकत प्रमाणपत्र देण्यासंदर्भात आयुक्तांनी २ जुलै रोजीच्या नियमबाह्य ठरावाचा अहवालात उल्लेख केला आहे.
शिवसेनेला गोंजारण्याचा प्रयत्न
एकीकडे १५ कोटींच्या मुद्यावरून शिवसेनेला कोंडीत गाठणाऱ्या सत्तापक्ष भाजपकडून दुसरीकडे शिवसेनेला गोंजारण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती आहे. अशावेळी सभागृहात सेनेचे नगरसेवक कितपत प्रामाणिक भूमिका वठवितात, हे दिसून येणार आहे.