रब्बी हंगामात सिंचनासाठी १४० दलघमी पाणी सोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 12:38 PM2018-12-08T12:38:23+5:302018-12-08T12:41:01+5:30
अकोला : जिल्ह्यातील धरणात २१६ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध असल्याने यावर्षी १४० दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात येणार असल्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे.
- राजरत्न सिरसाट
अकोला : जिल्ह्यातील धरणात २१६ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध असल्याने यावर्षी १४० दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात येणार असल्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. त्यामुळे या रब्बी हंगामात २३ हजार हेक्टरवरील पिके फुलणार आहेत.
जिल्ह्यात काटेपूर्णा, वान हे दोन मोठे, मोर्णा, निर्गुणा, उमा तीन मध्यम तर २९ लघू प्रकल्प आहेत. या प्रकल्पामध्ये सध्या २१६ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध आहे. यातील १४० दशलक्ष घनमीटर पाणी यावर्षी संपूर्ण रब्बी हंगामात सहा पाळीत सोडण्यात येणार आहे. वान धरणाचे पाणी १२ नोव्हेंबरपासून सोडण्यात येत आहे. या धरणातून पाणी सोडण्याची पहिली पाळी संपली असून, दुसऱ्यांदा पाणी सोडण्यात आले आहे. शेवटच्या भागापर्यंत पाणी पोहोचत नसल्याची शेतकºयांची तक्रार आहे. वान धरणात आजमितीस ७२.६५ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध आहे. यावर्षी यातील ४३ दलघमी जलसाठा पिकांना पाणी देण्यासाठी सोडण्यात येणार आहे. यापैकी आतापर्यंत १.५ दलघमी पाणी सोडण्यात आले आहे.
बार्शीटाकळी तालुक्यातील काटेपूर्णा धरणात ६३.८६ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे. या धरणातूनही १ नोव्हेंबरपासून पाणी सोडण्यात येत आहे. सहा पाळीत हे पाणी सोडण्यात येणार असून, आतापर्यंत ११ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा धरणात १०.६० दलघमी साठा आहे. या धरणातून यावर्षी सहा पाळीत पाणी सोडले जात आहे. पातूर तालुक्यातील निर्गुणा धरणात २६.९२ दलघमी जलसाठा आहे. या धरणातूनही सहा पाळीत पाणी सोडण्यात येत आहे. याच तालुक्यातील मोर्णा धरणात २०.२४ दलघमी जलसाठा असल्याने या धरणाच्या क्षेत्रातील शेतीला तीन टप्प्यातच पाणी सोडण्यात येणार आहे. मागील काही वर्षांत या धरणातून पाणी सिंचनासाठी मिळाले नसल्याने रब्बी, उन्हाळी हंगामातील पिके शेतकºयांना घेता आली नाहीत. यावर्षी वºहाडातील पाच जिल्ह्यांपैकी अकोल्यातील धरणातील पाणीसाठा बºयापैकी आहे. त्यामुळे यावर्षी रब्बी पिकांना पाणी सोडण्यात येत आहे.
- जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघू प्रकल्प मिळून २१६ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे. यापैकी १४० दलघमी पाणी सहा टप्प्यात सिंचनासाठी सोडण्यात येत आहे.
नयन लोणारे,
शाखा अभियंता,
पाटबंधारे विभाग, अकोला.