बाजार समितीमधील तिढा आज सुटणार?
By admin | Published: August 6, 2016 02:03 AM2016-08-06T02:03:59+5:302016-08-06T02:03:59+5:30
प्रातिनिधिक समित्यांच्या माध्यमातून तोडगा काढा! बाजार समितीचे खरेदीदार व अडत्यांना निर्देश.
अकोला, दि. ५ : गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीमधील व्यवहार ठप्प झालेले आहेत. त्यावर कायम स्वरूपी व ठोस तोडगा काढण्यासाठी बाजार समितीने खरेदीदार संघटना व अडत्या मंडळाला सात-सात सदस्यांच्या समितीचे गठन करण्याचे निर्देश दिले. या दोन्ही समित्यांची संयुक्त बैठक शनिवारी सकाळी बाजार समितीच्या निर्देशानुसार होणार आहे. या बैठकीतही तोडगा निघाला नाही तर बाजार समिती कायदेशीर कारवाई करणार असल्याचे माहिती सुत्रांनी दिली.
बाजार समितीमध्ये अडत शेतकर्यांऐवजी खरेदीदारांनी देण्याच्या निर्णयाला विरोध करीत अनेक खरेदीदारांनी व्यवहार ठप्प केले. त्यावर बाजार समितीने खरेदीदारांना दोन वेळा नोटीस दिल्या. त्यानंतर व्यवहार सुरू करण्याचा निर्णय तर झाला; पण त्यासाठी अडत्यांना बाजुला ठेवून सरळ विक्रीचा पर्याय निवडण्यात आला. या पर्यायाला शेतकर्यांनी अजिबात प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे व्यवहार ठप्पच राहिले. आता बाजार समितीने खरेदीदार संघटना व अडत्या मंडळाला त्यांच्या प्रत्येकी सात सदस्यांच्या प्रातिनिधिक समित्या गठन करण्याचे निर्देश दिले. या प्रातिनिधिक समित्या शनिवारी सकाळी आपसात चर्चा करून निर्णय घेणार आहेत. राज्य सरकारचा नियम पाळून या नियमानुसार व्यवहार सुरळीत होतात की या नियमाला बाजूला ठेवून काही वेगळा तोडगा काढला जातो, याकडे सर्व शेतकर्यांचे लक्ष लागले आहे. कसाही तोडगा काढा; पण शेतकर्याला अडत देण्याचे काम पडू नये अशी शेतकर्यांची अपेक्षा आहे. शनिवारच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर बाजार समिती कायदेशीर कारवाई करू शकते, त्यामुळे आता तोडगा निघेल, अशी आशा आहे.