अकोल्याचे दूध पश्चिम महाराष्ट्रात पाठविणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 04:19 PM2020-03-31T16:19:42+5:302020-03-31T16:20:01+5:30
पश्चिम महाराष्ट्रातील राजाराम बापू डेअरीला दूध पाठविण्याची तयारी करण्यात आली आहे.
अकोला : शासकीय दूध योजनेकडे दुधाची आवक ७ हजार ५०० लीटर दुधाची आवक आहे; परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागणी घटल्याने येथील दूध पश्चिम महाराष्ट्रात पाठविण्याची तयारी शासकीय दूध योजना प्रशासनाने सुुरू केली आहे. शासकीय दूध योजनेक डे मूर्तिजापूर येथून २,२००, अकोट २,०००, स्थानिक ६०० आणि वाशिम येथून २,१०० लीटर दुधाची आवक होत आहे. दुधाची मागणी घटल्याने एक दिवसाआड दुधाचे हे संकलन केले जात आहे. दहा दिवसांपूर्वी दुधाचा टँकर मुंबईला पाठविण्यात आला. तथापि, कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर तेथीलही दुधाची मागणी घटल्याने मुंबईला दुधाचे टॅँकर पाठविणे बंद केले आहे. शासकीय दूध डेअरीचे दूध सर्वात शुुद्ध आहे; परंतु कमिशन कमी असल्याने या दुधाला प्रतिनिधी उचलत नाहीत. त्यामुळे पाकीटबंद पिशव्याचे उत्पादनही कमी करण्यात आले आहे. शिवाय एक दिवसाआड संकलन होत असल्याने हे दूध बाहेरगावी पाठविल्यास खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या शासकीय दूध डेअरीचे काम थंडावले. हे दूध शुद्ध असल्याने २५ रुपये लीटर आहे. दरम्यान, नवीन नियोजन करण्यात येत असूून, पश्चिम महाराष्ट्रातील राजाराम बापू डेअरीला दूध पाठविण्याची तयारी करण्यात आली आहे.
- दुधाचे संकलन एक दिवसाआड केले जात आहे. साडेसात हजार लीटरचे हे संकलल आहे; परंतु मागणी घटल्याने हे दूध आता पश्चिम महाराष्ट्रात पाठविण्यात येणार आहे.
- देवानंद सोळंके, प्रभारी दुग्धशाळा व्यवस्थापक, शासकीय दूध योजना, अकोला.