बॅंकांमधील गर्दी कमी हाेणार तरी कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:09 AM2021-05-04T04:09:03+5:302021-05-04T04:09:03+5:30

अकाेला : काेराेनाचा वाढता उद्रेक लक्षात घेता प्रशासनाने विविध स्वरूपातील निर्बंध लागू केले, या निर्बंधांमधून अत्यावशक सेवा वगळल्या आहेत. ...

Will there ever be less congestion in banks? | बॅंकांमधील गर्दी कमी हाेणार तरी कधी?

बॅंकांमधील गर्दी कमी हाेणार तरी कधी?

Next

अकाेला : काेराेनाचा वाढता उद्रेक लक्षात घेता प्रशासनाने विविध स्वरूपातील निर्बंध लागू केले, या निर्बंधांमधून अत्यावशक सेवा वगळल्या आहेत. त्यामध्ये बँकांचाही समावेश आहे. बँकांचा वेळ कमी हाेऊनही गर्दी कमी हाेताना दिसत नाही. या गर्दीमुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. गर्दीमधून काेराेनाचा प्रसार हाेण्याची चिन्हे आहेत.

जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे संकट दिवसागणिक गंभीर होत चालले आहे. असे असतानाही नागरिक अद्याप बेफिकीर असून, प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे अनेकांकडून उल्लंघन केले जात आहे. दरम्यान, जिल्ह्यातील बँका सुरू ठेवण्यास प्रशासनाने सकाळी ९ ते दुपारी १ ही वेळ निर्धारित केलेली आहे. या वेळेत पैसे डिपाॅझिट करायला येणारे, काढायला येणाऱ्यांसह अन्य कामानिमित्त बँकेत येणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात आहे. प्रत्येकाच्या तोंडाला मास्क किंवा रुमाल लावणे बंधनकारक करण्यात आले असून, हा नियम पाळला जात आहे. मात्र, ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा नियम पायदळी तुडविला जात असल्याचे दिसून येत आहे. बँकांच्या प्रवेशद्वारासमोर लावण्यात येणाऱ्या रांगांमध्ये नागरिक अगदीच खेटून उभे राहत असल्याने ही बाब कोरोना संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

काेट....

पेन्शनमधील काही रक्कम काढायची हाेती म्हणून बँकेत आलाे हाेताे. मास्क लावला आहे. मात्र, रांगेत तर लागावेच लागते. १५ दिवसांतून एकदाच आलाे आहे. काेराेनाची भीती आहेच की, पण व्यवहारही आहेत, ते करावेच लागतात.

पांडुरंग शेळके

काेट...

काही पैशांची गरज हाेती, त्यामुळे बँकेत आलाे. मास्क लावला आहे, सॅनिटायझरही साेबत आहे. आता रांगेत गर्दी आहे ती तर टाळता येणार नाही ना? महत्त्वाच्या कामासाठी पैसा लागताेच.

संदीप काठाेळे

स्टेट बँक डाबकी राेड शाखा

या शाखेमध्ये ग्राहकांची गर्दी नेहमीच असते. ग्राहकांसाठी बँकेने सावली उभारली आहे. मात्र, ती अपुरी पडते. तेथील गार्ड प्रत्येक ग्राहकाला एकापाठाेपाठ एक असे आतमध्ये साेडतात. त्यामुळे आतमध्ये गर्दी हाेत नसली तरी बाहेर मात्र ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा फज्जा उडत आहे.

जिल्हा सहकारी बँक जि.प. शाखा

या शाखेत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची सर्वाधिक खाती आहेत. पेन्शनची गर्दी, शासनाच्या विविध याेजनांचे लाभार्थी व नियमित ग्राहक अशी गर्दी असते. येथे प्रत्येक ग्राहकाला सॅनिटायझर दिले जाते. मात्र, ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळणे जिकिरीचे हाेते.

बँकेचे कर्मचारी म्हणतात लाेक ऐकत नाहीत

बँकांसाठी सकाळी ९ ते १ एवढाच वेळ आहे, त्यामुळे या वेळेत आपले व्यवहार पार पडले पाहिजेत याची धांदल लाेकांना असते. ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळा म्हणून कितीही सांगितले तरी लाेकांना ते कळत नाही. काही जबाबदार ग्राहक मात्र नियमांचे पालन करतात. आधीच कमी वेळ त्यामध्ये आम्ही किती वेळा समजावणार अशी अगतिकताही बँकेचे कर्मचारी व्यक्त करतात.

Web Title: Will there ever be less congestion in banks?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.