नाट्यगृहासाठी प्रयत्न करणार- मोहन जोशी
By admin | Published: July 4, 2014 12:22 AM2014-07-04T00:22:07+5:302014-07-04T00:41:50+5:30
शहरात नाट्यगृह व्हावे यासाठी आम्ही जिल्हाधिकार्यांना भेटलो असून, पाच कोटी रुपये त्वरित मंजूर करावे, अशी मागणी केली आहे.
अकोला: शहरात नाट्यगृह व्हावे यासाठी आम्ही जिल्हाधिकार्यांना भेटलो असून, पाच कोटी रुपये त्वरित मंजूर करावे, अशी मागणी केली आहे. यानंतर राज्याचे सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांना भेटून आम्ही नाट्यगृहासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मराठी चित्रपट अभिनेते मोहन जोशी यांनी गुरुवारी सायंकाळी येथे केले.
मलकापूर-अकोला शाखेचे उद्घाटन गुरुवारी सायंकाळी प्रमिलाताई ओक सभागृहात मोहन जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष प्रमोद भुसारी होते, तर मंचावर मलकापूर-अकोला शाखेचे अध्यक्ष प्रा. मधू जाधव उपस्थित होते. यावेळी मोहन जोशी म्हणाले, की या शाखेने विविध स्पर्धांचे आयोजन करावे, एकांकिका स्पर्धा, संमेलनात सक्रिय सहभाग घ्यायला हवा. सुप्त अवस्थेत असलेल्या शाखांना कार्यरत करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. अकोल्यात नाट्य सभागृह व्हावे, यासाठी मंत्र्यांना भेटून आपण सर्व प्रयत्न करू, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. यावेळी नाट्यकर्मी अरुण घाटोळ यांना जीवनगौरव देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच माजी आमदार व अभिनेते तुकाराम बिरकड, नाट्यक्षेत्राशी संबंधित बालचंद्र उखळकर, गजानन घोंगडे, किशोर बळी यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार कार्यक्रमाचे संचालन राधिका साठे यांनी केले. अध्यक्षीय भाषणातून प्रमोद भुसारी म्हणाले, की अकोल्यात येत्या तीन वर्षात नाट्य चळवळ बळकट होईल.
या शाखेने तीन वर्षानंतर अखिल भारतीय नाट्यसंमेलन घेण्याची तयारी ठेवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संचालन सीमा शेटे, तर आभार प्रदर्शन अशोक ढेरे यांनी केले.