उमेदवारांच्या हालचालींवर राहणार वॉच !
By admin | Published: September 17, 2014 02:28 AM2014-09-17T02:28:55+5:302014-09-17T02:28:55+5:30
अकोला पूर्व मतदारसंघाची आढावा सभा
अकोला: अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या नियुक्त अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी, आचारसंहिता पथकातील नियुक्त कर्मचार्यांच्या मंगळवारी तहसील कार्यालयात झालेल्या सभेमध्ये निवडणूक काळामध्ये उमेदवारांच्या प्रत्येक हालचालींवर वॉच ठेवण्यासाठी १२ पथके तयार करण्यात आली आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सभा पार पडली. सभेमध्ये निवडणूक काळात उमेदवारांच्या हालचालींवर वॉच ठेवण्यासाठी तीन भरारी पथके, तीन स्टॅटिक सर्व्हेलन्स पथक, व्हिडिओ सर्व्हेलन्स पथक, खर्च नियंत्रण समिती, व्हिडिओ व्हिव्हिंग पथक असे एकूण १२ पथके तयार करण्यात आली. या प थकांच्या माध्यमातून संवेदनशील घटना, मतदारांना पैशांचे आमिष दाखविणे, दारूचे वितरण करणे व इतर साहित्य वितरण करणे, अवैध दारूची वाहतूक, संशयास्पद वस्तू, विनापरवाना शस्त्रसाठा, अवैध पैसा आदींवर लक्ष ठेवून या घटनांविषयी तातडीने वरिष्ठ अधिकार्यांना कळविण्याविषयी चर्चा करण्यात आली. सभेमध्ये सर्व क्षेत्रीय अधिकार्यांना ३१ अकोला पूर्व मतदारसंघातील सर्व म तदान केंद्र व्यवस्थित आहेत की नाहीत, याबाबतची तपासणी करून अहवाल देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
** ३0१ मतदान केंद्रांची २६ झोनमध्ये विभागणी
मतदानाच्या प्रक्रियेसाठी ३0१ मतदान केंद्रांची २६ झोनमध्ये विभागणी करण्यात आली. त्यासाठी झोनल ऑफिसर नियुक्त आले असून, त्यांना प्रशिक्षण देण्यात आले व महत्त्वाच्या सूचनासुद्धा देण्यात आल्या. क्षेत्रीय अधिकार्यांना अकोला पूर्वमधील सर्व मतदान केंद्र व्यवस्थित आहे की नाहीत, याची तपासणी करून अहवाल देण्याच्या सुचना करण्यात आल्या.
**स्टॅटिक सर्व्हेलन्स पथक राहणार चेकपोस्टवर कार्यरत
निवडणूक काळात कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने खबरदारी घेण्यात येणार आहे. त्यासाठी स्टॅटिक सर्व्हेलन्स पथक नेमण्यात आले असून, हे पथक मतदारसंघा तील चेकपोस्टवर कार्यरत राहील आणि अवैध दारूची वाहतूक, संशयास्पद वस्तू, विनापरवाना शस्त्रसाठा, अवैध पैसा यावर लक्ष ठेवणार आहे.