कधी धावेल वैदर्भीयांची रेल्वे आशेच्या रुळावर?
By admin | Published: February 24, 2016 01:47 AM2016-02-24T01:47:06+5:302016-02-24T01:47:06+5:30
२५ फेब्रुवारीला रेल्वे अर्थसंकल्प; अकोलेकरांच्या अपेक्षा.
अकोला: गेल्या अनेक वर्षांंपासून अकोला-खंडवा मिटरगेज रेल्वे मार्गाच्या गेजपरिवर्तनाचा प्रश्न प्रलंबित आहे. वनविभागाच्या अतिसंरक्षित क्षेत्रातून जाणार्या अडगाव (वान) ते तुकईथड या दरम्यानच्या गेजपरिवर्तनास केंद्र तथा राज्य वनविभागाची अद्याप परवानगी मिळालेली नाही. अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांच्या प्रयत्नातून २0१५ च्या अखेरिस केंद्र शासनाने अकोला ते आकोट दरम्यानच्या गेजपरिवर्तनाकरीता ३५ कोटींचा निधी मंजूर केला. त्यातील २९ कोटी दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने अकोला-आकोट दरम्यानच्या जमीन अधिग्रहणापोटी राज्य महसूल विभागास दिले. लवकरच अकोला-आकोट दरम्यान रेल्वे मार्गावरील मोठे पूल उभारणीची ई-निविदा उघडण्यात येणार असल्याची माहिती आहे. एकंदरित पाहता, अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पास अशंत: का होईना पण चालना मिळाली आहे. गेजपरिवर्तनानंतर वनविभागातील श्वापदांना धोका निर्माण होऊ शकतो या जाणिवेने वनविभागाने गेजपरिवर्तना परवानगी नाकारली आहे. यावर पर्याय म्हणून मध्यंतरी दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने हा रेल्वे मार्ग हिवरखेडमार्गे वळविण्याचा प्रस्ताव केंद्राधिकार्यांकडे मांडला होता, मात्र सोयीस्कर नसल्याने त्यास देखील परवानगी नाकारण्यात आली. राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश या चार राज्यांना एकसंध जोडणारा हा मार्ग केवळ अकोला-खंडवा दरम्यान रखडला आहे. देशाच्या हृदयस्थानी थांबलेला हा रक्तप्रवाह केवळ वनविभागाच्या निर्णयानेच सुरळीत होऊ शकतो. राहिला प्रश्न निधीचा, अकोला-आकोट दरम्यानच्या गेजपरिवर्तनासाठी लागणारा निधी गुरूवार, २५ फेब्रुवारी रोजी संसदेत सादर होणार्या रेल्वे अर्थसंकल्पात मंजूर होण्याची शक्यता खासदार संजय धोत्र यांनी व्यक्त केली आहे. याव्यतिरिक्त इंग्रजकालीन अचलपूर-मूर्तिजापूर-यवतमाळ या नॅरोगेज रेल्वे मार्गाच्या गेजपरिवर्तनाचा प्रस्ताव देखील केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या कोर्टात आहे. गतवर्षी मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पापर्यंंततरी या मार्गाच्या विस्तारिकरणावर निर्णय झाला नव्हता. यंदा या मार्गाच्या गेजपरिवर्तनाचा मुद्दा सुद्धा रेल्वे अर्थसंकल्पात उपस्थित होईल अशी आशा वैदर्भियांना लागली आहे.