एचआयव्हीचा विंडो पीरियड ठरतोय चिमुकल्यांसाठी घातक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 10:41 AM2021-09-06T10:41:54+5:302021-09-06T10:42:00+5:30
The window period of HIV : अकोल्यात दोन चिमुकल्यांना संक्रमित रक्ताद्वारे एचआयव्हीची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
- प्रवीण खेते
अकोला : रक्तदानातून अनेकांना जीवदान मिळते. मात्र, काही चुकांमुळे ते रुग्णासाठी घातकही ठरू शकते. असाच काहीसा प्रकार गत आठवड्यात मूर्तिजापूर तालुक्यातील एका आठ महिन्यांच्या चिमुकलीच्या बाबतीत घडला. संक्रमित रक्त दिल्याने त्या चिमुकलीला एचआयव्हीची बाधा झाली. ही पहिलीच घटना नाही, तर यापूर्वीदेखील अकोल्यात दोन चिमुकल्यांना संक्रमित रक्ताद्वारे एचआयव्हीची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यावर आळा घालण्यासाठी तंत्रज्ञान असले, तरी त्यासाठी पुढाकार घेण्यास आरोग्य यंत्रणा उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
रक्तदात्यांकडून संकलित रक्तामध्ये एचआयव्ही पॉझिटिव्ह रक्त आढळल्यास ते नष्ट केले जाते. त्यामुळे इतरांना संक्रमणाचा धोका कमी होतो. मात्र, रक्तदाता एचआयव्हीच्या विंडो पीरियडमध्ये असेल, तर रक्तपेढ्यांमध्ये होणाऱ्या चाचण्यांमध्ये त्याची एचआयव्ही चाचणी निगेटिव्ह येते. विंडो पीरियडमधील हेच संक्रमित रक्त अनेकांसाठी घातक ठरत आहे. असाच प्रकार मूर्तिजापूर तालुक्यातील एका आठ महिन्यांच्या चिमुकलीच्या बाबतीत झाल्याचे सांगितले जाते. मागील पाच वर्षांत अकोल्यातील ही तिसरी घटना असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. यापूर्वी थॅलेसिमीया आणि सिकलसेल आजाराने ग्रस्त दोन चिमुकल्यांनादेखील याच प्रकारे एचआयव्हीची बाधा झाली होती. ‘ब्लड ट्रान्समिशन’द्वारे एचआयव्हीचा धोका टाळण्यासाठी सुमारे तीन वर्षांपूर्वी शासकीय रक्तपेढीतर्फे ‘नॅट’ प्रणाली कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. मात्र त्यानंतर येथील प्रशासनालाच त्याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे.
काय आहे ‘नॅट’ टेस्ट?
नॅट म्हणजेच न्यूक्लिक ॲसिड टेस्ट ही एचआयव्ही निदानाची विश्वसनीय चाचणी मानली जाते.
आठ ते दहा दिवसांचा विंडो पीरियड असेल, तरी नॅट चाचणीद्वारे एचआयव्ही असल्याचे निदान करणे शक्य आहे.
काय आहे एचआयव्हीचा विंडो पीरियड?
एचआयव्हीचा विंडो पीरियड हा साधारणत: तीन महिन्यांचा असतो.
या तीन महिन्यांच्या कालावधीत एचआयव्हीचे संक्रमण असले, तरी त्याचे निदान होत नाही.
याच विंडो पीरियडमधील व्यक्तींच्या रक्ताद्वारे एचआयव्हीचा संसर्ग एकापासून दुसऱ्यापर्यंत होण्याची दाट शक्यता असते.
रक्तदात्यांना चाचण्यांचे अहवाल देणे आवश्यक
रक्तदात्यांकडून संकलित रक्ताच्या विविध चाचण्या रक्तपेढींमध्ये केल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने एचआयव्ही, सिकलसेल, हिपॅटाइटीस बी, सी यासह इतर महत्त्वाच्या रक्तचाचण्यांचा समावेश आहे.
नियमानुसार, या चाचण्यांचे अहवाल रक्तपेढ्यांमार्फत रक्तदात्यांना देणे गरजेचे आहे.
एखाद्या चाचणीत रुग्ण एचआयव्ही पॉझिटिव्ह असेल, तर तशी माहिती जिल्हा ‘एआरटी’ केंद्राला देणे आवश्यक आहे.
मात्र, रक्तपेढ्यांकडून आराेग्य यंत्रणेला देखील या चाचण्यांचे अहवाल दिले जात नाहीत.