पाेलीस दलात बदलीचे वारे, आकाेट ठाण्यासाठी अनेकांची फिल्डिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 10:30 AM2021-07-07T10:30:42+5:302021-07-07T10:30:48+5:30
Transfers in Akola Police : अकाेला जिल्ह्यातील २३ पैकी नाे टेंशन असलेल्या काही पाेलीस ठाण्यांत पाेस्टिंग मिळावी म्हणून अनेकांनी फिल्डिंग लावल्याची माहिती आहे.
अकाेला : दरवर्षी एप्रिल व मे महिन्यामध्ये हाेणाऱ्या बदल्या काेराेनामुळे गत दाेन वर्षांपासून लांबत चालल्या आहेत. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील जुलै महिन्यात पाेलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या हाेणार असून, आता पाेलीस दलात पाेलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे वारे वाहू लागले आहे. अकाेला जिल्ह्यातील २३ पैकी नाे टेंशन असलेल्या काही पाेलीस ठाण्यांत पाेस्टिंग मिळावी म्हणून अनेकांनी फिल्डिंग लावल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील सुमारे ३५० पाेलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या हाेणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. जिल्ह्यातील आकाेट, अकाेला शहर, मूर्तिजापूर व बाळापूर या चार उपविभागातील पाेलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. त्यासाठी पाेलीस कर्मचाऱ्यांना पसंतीचे ठिकाण मागण्यात आले आहे. तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी असलेल्या पाेलीस कर्मचाऱ्यांच्या आता बदल्या हाेणार आहेत.
काेणत्या उपविभागातून किती बदल्या
अकाेला ९३
आकाेट ७७
मूर्तिजापूर ६४
बाळापूर ६६
या तीन ठिकाणांना पसंती
स्थानिक गुन्हे शाखा
पाेलीस कर्मचाऱ्यांची पहिली पसंती ही स्थानिक गुन्हे शाखेला असते. या ठिकाणावरून संपूर्ण जिल्ह्याचे कामकाज चालत असल्याने अनेक कर्मचारी या ठिकाणी काम करण्यास इच्छुक आहेत.
वाहतूक शाखा
शहर वाहतूक शाखा आता जिल्हा वाहतूक शाखा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी वाहतूक शाखेत बदली व्हावी म्हणूण फिल्डिंग लावून आहेत.
आकाेट उपविभाग
जिल्ह्यातील बहुतांश कर्मचाऱ्यांनी आकाेट उपविभागात बदली देण्यात यावी अशी मागणी केली आहे. या उपविभागात तेल्हारा, हिवरखेड, आकाेट शहर, आकाेट ग्रामीण व दहीहांडा पाेलीस ठाण्यांचा समावेश आहे.
या ठाण्यात नकाे रे बाबा
जुने शहर पाेलीस स्टेशन
पाेलीस दलातील अनेक कर्मचारी जुने शहर पाेलीस ठाण्यात बदली नकाे रे बाबा असे म्हणतात. गुन्हेगारी जास्त असल्याने, तसेच कायम बंदोबस्त असल्यामुळेही या पाेलीस ठाण्याला नकार आहे.
चान्नी
पातूर तालुक्यातील चान्नी पाेलीस स्टेशन हे जंगलातील व शहरापासून खूप आतमध्ये असलेले पाेलीस स्टेशन असल्यानेही अनेक जण या पाेलीस ठाण्यात बदली नकाेची मागणी करतात.
आकाेट फैल
शहरातील आकाेट फैल पाेलीस ठाण्याच्या हद्दीत कायम वाद सुरू असतात. त्यामुळे डाेक्याला ताण नकाे म्हणून या पाेलीस ठाण्यात बदली टाळण्याचे प्रयत्न पाेलीस कर्मचारी करतात.