शिवसेनेत फेरबदलाचे वारे; मुहूर्ताची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 10:30 AM2020-04-24T10:30:40+5:302020-04-24T10:30:53+5:30

जिल्हा व शहर कार्यकारिणीत फेरबदलाचे वारे वाहू लागले आहे.

Winds of change in Shiv Sena; Waiting for the moment! | शिवसेनेत फेरबदलाचे वारे; मुहूर्ताची प्रतीक्षा!

शिवसेनेत फेरबदलाचे वारे; मुहूर्ताची प्रतीक्षा!

Next

- आशिष गावंडे  
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: आगामी दीड वर्षांवर येऊन ठेपलेली नगर परिषद, नगरपालिकेची निवडणूक तसेच २०२२ मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या अंतर्गत गोटात हालचाली सुरू झाल्या असून, जिल्हा व शहर कार्यकारिणीत फेरबदलाचे वारे वाहू लागले आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक एकहाती लढणाºया शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांची आगामी रणनीती काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आज रोजी देशभरासह महाराष्ट्रात संसर्गजन्य कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. आज रोजी कोरोनामुळे सर्व उद्योग-व्यवसाय ठप्प झाल्याने अनेकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. कोरोनाचे संकट लवकरात लवकर टळो, अशी अपेक्षा वर्तविली जात असून, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य शासनाकडूनही महत्त्वाचे उद्योग-व्यवसाय सुरू करण्याची मुभा दिली जात आहे. अशा सर्व सकारात्मक बाबी लक्षात घेता आगामी दीड वर्षांवर येऊन ठेपलेल्या नगर परिषद-नगरपालिका निवडणुकीसाठी तसेच २०२२ मधील महापालिकेच्या निवडणुकीसाठी आतापासूनच शिवसेनेच्या गोटात हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे.
शिवसेना नेते माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार अरविंद सावंत यांनी सप्टेंबर २०१६ मध्ये शिवसेनेच्या जिल्हा व शहर कार्यकारिणीत मोठा फेरबदल करीत शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाची सूत्रे नितीन देशमुख यांच्या ताब्यात दिली होती. नोव्हेंबर २०१६ मध्ये पार पडलेली नगर परिषद व नगरपालिका निवडणूक तसेच फेब्रुवारी २०१७ मधील मनपाची सार्वत्रिक निवडणूक शिवसेनेने भाजपसोबत युती न करता स्वतंत्रपणे लढविली होती. हाच कित्ता २०२० मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गिरविण्यात आला. या निवडणुकीतही शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी महाविकास आघाडीची साथ न घेता शिवसेनेच्या उमेदवारांसाठी एकहाती किल्ला लढविल्याचे चित्र पाहावयास मिळाले होते.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे १३ सदस्य निवडून आल्याने शिवसेनेच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळेच आगामी नगर परिषद, नगरपालिका तसेच महापालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी जिल्हा व शहर कार्यकारिणीत फेरबदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे.
...म्हणून फेरबदलाची गरज
शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार अरविंद सावंत यांच्या निर्देशानुसार २०१६ मध्ये शिवसेनेच्या जिल्हा व शहर कार्यकारिणीत बदल करण्यात आला होता. गत चार वर्षांच्या कालावधीमध्ये जिल्हा व शहर कार्यकारिणीत सामील पुरुष व महिला पदाधिकाऱ्यांनी पक्षवाढीसाठी किती प्रामाणिक प्रयत्न केले, याचा लेखाजोखा तयार केला जात आहे. जिल्हा असो वा शहर कार्यकारिणीतील काही पदाधिकारी संघटन बांधणीत कुचकामी ठरल्यामुळेच फेरबदल केला जाणार असल्याची माहिती आहे.


‘पोस्टर बॉय’ बाजूला सारणार!
कोरोनाच्या आपत्तीमुळे भविष्यात आर्थिक तसेच राजकीय क्षेत्रात मोठ्या घडामोडी होणार असल्याचे संकेत आहेत. अशावेळी पक्षाला प्रामाणिक व मेहनती शिवसैनिकांची फळी उभी करायची आहे. आजवर होर्डिंग, बॅनरच्या माध्यमातून स्वत:ला मिरविणाºया ‘पोस्टर बॉय’ पदाधिकाºयांना बाजूला सारून त्याऐवजी निष्ठावान शिवसैनिकांना संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.


वर्तमान परिस्थिती लक्षात घेता आगामी दीड वर्षानंतर होणाºया नागरी स्वायत्त संस्थांच्या निवडणुकीच्यावेळी राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ होईल, हे निश्चित आहे. त्यावेळी निर्माण होणाºया परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आम्ही आतापासूनच तयारीला लागलो आहोत. योग्यवेळी सर्व बाबी जाहीर केल्या जातील.
- नितीन देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार.

 

Web Title: Winds of change in Shiv Sena; Waiting for the moment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.