अकोल्यात वादळी वा-यासह अवकाळी पाऊस
By admin | Published: May 20, 2016 01:46 AM2016-05-20T01:46:43+5:302016-05-20T01:46:43+5:30
पाच दिवसांच्या प्रचंड उकाड्यानंतर नागरिकांना दिलासा.
अकोला: अंगाची लाही-लाही करणार्या उन्हामुळे प्रचंड उकाडा जाणवत असताना, गुरुवारी दुपारी वादळी वार्यासह अवकाळी पाऊस बरसल्याने प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही काळ दिलासा मिळाला.
गत रविवारपासून तापमानात प्रचंड वाढ झाली. रविवारी अकोल्याचा पारा ४५ अंश डिग्री सेल्सिअसवर पोहोचला. त्यानंतर उष्णतेच्या लाटेत उन्हाचा पारा वाढत गेला. बुधवारी तर अकोल्याचे तापमान ४७.१ डिग्री अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
तापत्या उन्हामुळे सूर्य आग ओकू लागल्याचे जाणवत आहे. गुरुवारीदेखील अकोल्याचा पारा ४६.३ अंश डिग्री सेल्सिअस होता. गत पाच दिवसांपासून कडाक्याच्या उन्हामुळे वातावरणातील प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण झाले असताना गुरुवारी दुपारी वातावरणात बदल झाला. काळेभोर ढग दाटले आणि दुपारी ३ ते ३.४५ वाजताच्या दरम्यान अकोला शहरासह परिसरात वादळी वार्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणातील दाहकता कमी झाल्याने, गत पाच दिवसांपासून प्रचंड उकाड्यापासून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. वादळी वार्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे मात्र नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती. तर उकाड्याच्या वातावरणात बच्चे कंपनीसह लहान-मोठय़ांनी अवकाळी पावसात भिजण्याचा आनंदही लुटला.