वाइन बारला देशी दारू दुकानांचे स्वरूप!
By admin | Published: April 17, 2017 01:59 AM2017-04-17T01:59:53+5:302017-04-17T01:59:53+5:30
मद्यपींची गत केविलवाणी: अवैध विक्रीला ऊत
अकोला: दारू पिली की अंगात जोश संचारल्यासारखा मद्यपी वागतो. दारू अंगात भिनायला लागली की मद्यपी कोणतेही धाडस करायला तयार होतो; मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शहरातील ५६ पैकी ६ वाइन बार, २ वाइन शॉप सुरू आहेत. त्यामुळे आता बारमध्ये ऐटीत बसून दारू पिणाऱ्या मद्यपींचा तोरा पुरता उतरला आहे. दारूसाठी मद्यपी लाचार झाल्याचे दिसून येत आहेत. वाढत्या गर्दीमुळे वाइनबारला सुद्धा देशी दारू दुकानांचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील ५00 मीटर क्षेत्रात येणारे शहरात ९५ टक्के बार, शॉप, देशी दारूच्या दुकानांना सर्वोच्च न्यायालयाचा फटका बसला आहे. शहरामध्ये १0२ पैकी १६ वाइन बार, शॉप, बीअर शॉपी, देशी दारूची दुकाने सुरू आहेत. त्यातही सुरू असलेली सहाच वाइन बार आहेत आणि दोनच वाइन शॉप आहेत. त्यामुळे या वाइन बार आणि शॉप संपूर्ण शहरातील मद्यपींचा गर्दी गोळा होत आहे. गर्दी होत असल्यामुळे बार मालकांना मद्यपींना लवकर आटोपते घेण्याची विनंती करण्यात येत आहे. मद्यपींना वाइनबार, शॉपसमोर रांगेत उभे राहावे लागत आहे. सुरुवातीला ऐटीत आणि टोळक्यात गप्पाटप्पा करीत बसून मद्यपी दारूचा प्याला रिचवायचे आणि हव्या असलेल्या ब्रांडची वेटरकडे आॅर्डरकडे करायचे; परंतु आता ते दिवस संपल्यासारखे वातावरण बारमध्ये दिसत आहे.
दारूची आॅर्डर देण्यासाठी मद्यपींना सातत्याने वेटरला बोलवावे लागत आहे. बार कमी आणि मद्यपी जास्त अशी काहीशी परिस्थिती शहरामध्ये निर्माण झाली आहे. प्रचंड गर्दी होत असल्याने, बार मालकांनी टेबलजवळील खुर्च्याही काढून टाकल्या आहेत. टेबलसमोरच उभे राहून मद्यपींना दारूचे प्याले गळी उतरावे लागत आहेत.
मद्यपींची स्वयंसेवा...
बार, वाइन शॉप म्हटले की, मद्यपी दारूच्या नशेत शिव्या हासाडायचे. वाद घालायचे; परंतु ५६ पैकी ६ बारच शहरात सुरू असल्याने मद्यपींचा तोरा पूर्णत: उतरला आहे. गर्दीमुळे टेबलजवळ उभे राहून, धक्काबुक्की सहन करीत आणि एकाच प्लेटमधील स्नॅक्स खात दारू प्यायची वेळ त्यांच्यावर आली आहे. बारमध्ये तासन्तास गप्पा मारीत दारू रिचविण्याचे तर दूर, आता बार मालकच दारू घ्या आणि लवकर टेबल खाली करून पुढील ग्राहकांना संधी द्या, असे सातत्याने सांगत आहेत. आधी पैसे दिल्याशिवाय दारूसुद्धा दिल्या जात नसल्याचे चित्र सर्वच बारमध्ये पाहायला मिळते.
--