अकोट तालुक्यात ६५ विद्युत खांबावरील तारा तुटल्या; २० लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:18 AM2021-05-23T04:18:16+5:302021-05-23T04:18:16+5:30
अकोट : अवकाळी पावसाचा सर्वाधिक तडाखा तालुक्यातील महावितरणला बसला आहे. वादळाच्या तडाख्यात आठ विद्युत खांब, दोन रोहित्र पडले असून, ...
अकोट : अवकाळी पावसाचा सर्वाधिक तडाखा तालुक्यातील महावितरणला बसला आहे. वादळाच्या तडाख्यात आठ विद्युत खांब, दोन रोहित्र पडले असून, ६५ विद्युत खांबावरील तारा तुटल्या आहेत,परंतु २४ तास रात्रंदिवस काम करुन महावितरणने वीजपुरवठा सुरळीत केला आहे. वादळामुळे महावितरणला जवळपास २० लाख रुपये नुकसानीची झळ पोहोचली आहे.
अकोट तालुक्यात दि. १८ मे रोजी रात्रीच्या सुमारास आलेल्या वादळ वाऱ्यामुळे उपविभागातील १४ वीज उपकेंद्र बंद पडली होती. तसेच उच्चदाब वाहिनीचे आठ विद्युत खांब, लघु दाब वाहिनीचे ६५ खांबावरील वीज प्रवाहाच्या तारा तुटल्या होत्या. वादळाचा जोर पाहता चक्क दोन रोहित्र (डीपी) आधार दिलेल्या वीज खांबासह जमिनीवर वाकले होते. वीज तारांवर झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने तालुक्यातील वीजपुरवठा खंडित झाला होता. अकोटचे उपकार्यकारी अभियंता
गोपाल अग्रवाल यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली अकोट उपविभागातील अभियंता अजय वसू, अरूण जाधव, प्रफुल्ल कोकाटे, देशपांडे तसेच अकोट उपविभागातील ८० तांत्रिक कर्मचाऱ्यांसह कंत्राटदार एजन्सीची टीम अशा १६० जणांनी पाऊस वारा सुरु असताना अथक परिश्रम घेऊन रात्रंदिवस काम करुन वीजपुरवठा सुरळीत केला. या वादळामुळे महावितरणचे २०-२५ लाखांचे साहित्यासह नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान अकोट उपविभागात मनुष्यबळ कमी होते. दहा अभियंत्यांपैकी पाचजण विविध आजारामुळे सुटीवर तर काहीजण क्वांरटाईन होते, परंतु अशा परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत झाला.
---------------------------------
वादळामुळे अकोट शहर व ग्रामीण वीज यंत्रणेचे २०-२५ लाखांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महावितरणचे अधिकारी, कर्मचारी व कंत्राट एजन्सींनी रात्रंदिवस अथक परिश्रम करून वीजपुरवठा सुरळीत केला. अकोटवासीयांनी संयम राखून महावितरणला सहकार्य केले.
-जी. एस. अग्रवाल, उपकार्यकारी अभियंता, अकोट.
---------------------
कोविड सेंटरवरचा वीजपुरवठा दोन तासात सुरू
अकोट तालुक्यातील पाटसूल येथील कोरोना रुग्णांचे कोविड केअर सेंटरमध्ये १५० जण आहेत. अशा स्थितीत या ठिकाणी पडलेला वीज खांब उभा करुन केवळ दोन तासांत कोविड सेंटरचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला होता.