उन्हाळी सोयाबीन हातून घेतल्याने आता शेतकऱ्यांना खरीपाची आशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2022 05:58 PM2022-05-02T17:58:39+5:302022-05-02T17:58:46+5:30
Agriculture News : यावर्षी ६८ हजार ८०० हेक्टर शेतीचे खरीप नियोजन असणार आहे.
-संजय उमक
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : गतवर्षी तालुक्यात भरपूर प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने उत्पादनात कमालीची घट झाली होती. ती घट भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी १४३ हेक्टरवर उन्हाळी सोयाबीन पेरणीचा प्रयोग केला. वाढत्या तापमाने ते सोयाबीन सुध्दा होरपळून गेले. यामुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असल्याने पेरणी पूर्व मशागतीची कामे खोळंबली आहेत. बहुतांश शेती कोरडवाहू म्हणजे खरिपावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. मुबलक प्रमाणात पाऊस असल्याशिवाय येथील शेतकरी पेरणी करण्यासाठी धजावत नाही.
पिक कर्जावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात कर्जाची रक्कम बॅंकेने वाढवून न दिल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. कर्जाची रक्कम वाढवून मिळेल या आशेने जिल्हा बॅंकेचे पिक कर्जाची परतफेड शेतकऱ्यांनी केली पुन्हा कर्ज घेण्यासाठी अर्जही केला. पण बॅंकेने ती रक्कम वाढवून न देता पुन्हा तेवढेच कर्ज शेतकऱ्यांना देऊ त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कोरडवाहू शेतीतील कपाशीच्या पिकाचा हंगाम संपण्याआधीच उलंगवाडी झाली आहे. तालुका कृषी विभागाच्या नियोजनानुसार यावर्षी ६८ हजार ८०० हेक्टर शेतीचे खरीप नियोजन असणार आहे. त्यामध्ये सोयाबीन ४५ हजार हेक्टर, कपाशी ९ हजार हेक्टर, तुर ११ हजार हेक्टर, मुग २ हजार ५०० हेक्टर, उडीद १ हजार ३०० हेक्टरवर पेरा असणार आहे. खरीप हंगामात कापूस हेक्टरी १०. ११ क्विंटल, तूर ३२.२० क्विंटल, सोयाबीन १४.०५ क्विंटल, मूग १० क्विंटल उडीद ८ क्विंटल अशा प्रकारे उत्पन्न अपेक्षित असून यासाठी ४५ हजार क्विंटल घरगुती बियाणे उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. यासाठी गतवर्षीच्या ७० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी
करण्यात आली होती.
असे असेल शेतकऱ्यासाठी नियोजन
- घरचे सोयाबीन बियाणे म्हणून वापर करण्यासाठी सर्व गावांमध्ये बीज उगवण व बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक
- घेण्यात येत आहेत.
- सर्व गावांमध्ये गटांच्या माध्यमातून बांधावर खते व बियाणे पुरवठा करण्याकरिता नियोजन करणे सुरू
- आहे.
- माती परीक्षण अहवालानुसार अन्नद्रव्याचे व्यवस्थपन नियोजन केले आहे.
- किड व रोग नियंत्रण करिता बीजप्रक्रिया मोहीम स्वरुपात करण्याचे नियोजन केले आहे.
- शेणखत, गांडूळखत, हिरवळीचे खत वापर नियोजन केले आहे.
- पिकाची फेरपालट करण्याचे नियोजन केले आहे.
- आंतरपिक/ मिश्रीपिक पद्धतीचा अवलंब करण्याचे नियोजन केले आहे.
- पिकाच्या वाढीच्या आवश्यकते नुसार खताचा वापर करण्याचे नियोजन केले आहे.
- सूक्ष्म मूलद्रव्याचा वापर शेणखातासोबत करण्याचे नियोजन केले आहे.
ठिबक सिंचन द्वारे रासायानिक खतांचा वापर करण्याचे नियोजन केले आहे.
असा आहे खत साठ
खत - लागणारे मेट्रिक टन - आवंटन साठा
युरिया - ३५०० - ३५४४
डीएपी - २३०० - २३००
एमओपी - ७०२ - ७०२
एसएसपी - २५०० - २५३३
संयुक्त खते - ४०००- ३९०४
अंदाजानुसार पाऊस वेळेवर असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे वेळीच आटोपून घ्यावीत.पेरणीसाठी लागणाऱ्या बियाणांची उगवणक्षमता व बीज प्रकिया करूनच पेरणी करावी.. पेरणीकरिता १० वर्षाच्या आतील वाणाचा वापर करावा. पेरणीयोग्य पाऊस झाल्यावर पेरणी करावी. शेतकऱ्यांनी निविष्टा लवकर करून पेरणी वेळेवर करण्याचा प्रयत्न करावा.
-अमृता काळे, तालुका कृषी अधिकारी, मूर्तिजापूर