महिलेच्या बँक खात्यातून परस्पर रक्कम काढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 15:07 IST2019-11-02T15:06:58+5:302019-11-02T15:07:09+5:30
बँक खात्यातून आठ हजार, दहा हजार याप्रमाणे चार वेळा असे एकूण ४0 हजार रुपये काढण्यात आले.

महिलेच्या बँक खात्यातून परस्पर रक्कम काढली
अकोला: विदेशातील अज्ञात व्यक्तीने आॅनलाइन खरेदीच्या माध्यमातून एका महिलेच्या बँक खात्यातून परस्पर रक्कम काढल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आला आहे. ४0 हजार रुपयांनी या महिलेला गंडा घातला आहे. या प्रकरणात महिलेने सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, हे प्रकरण सायबर पोलिसांकडे सोपविण्यात येणार आहे.
सुरत येथील रहिवासी महिला भाऊबीजनिमित्त अकोल्यातील तोष्णीवाल ले-आउट परिसरात माहेरी आली होती. शुक्रवारी दुपारच्या सुमारास या महिलेच्या मोबाइल फोनवर तीन-चार संदेश आले. तिच्या बँक खात्यातून आठ हजार, दहा हजार याप्रमाणे चार वेळा असे एकूण ४0 हजार रुपये काढण्यात आले. त्यामुळे महिलेला धक्काच बसला. पतीसह महिला एका बँकेच्या शाखेत गेली असता, तिला विदेशात अज्ञात व्यक्तीने आॅनलाइन खरेदी करताना, बँक खात्यातून परस्पर पैसे काढून घेतल्याचे तिला सांगण्यात आले. त्यामुळे महिलेने सायंकाळी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी महिलेची तक्रार नोंदवून घेतली असून, ही तक्रार चौकशीसाठी सायबर पोलिसांकडे पाठविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या महिलेने कोणालाही बँक खाते क्रमांक, एटीएम कोड किंवा बँक खात्याची कोणतीही माहिती कोणालाही सांगितली नाही. तसेच कोणत्या बँकेतून फोन आल्याचाही प्रकार घडला नाही. असे असतानाही या महिलेच्या बँक खात्यातून आॅनलाइन पद्धतीने परस्पर रक्कम काढण्यात आली. त्यामुळे पोलिसांनासुद्धा आश्चर्य वाटले. यासंदर्भात सायबर पोलीस विभागच चौकशी करून नेमका काय प्रकार घडला, याचा छडा लावू शकतो. (प्रतिनिधी)