आठ दिवसात जिल्ह्यात १७२३२ प्रवासी दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 05:15 PM2020-03-31T17:15:24+5:302020-03-31T17:15:29+5:30
कोरोनाचा प्रसार रोखण्याचे मोठे आव्हान आरोग्य विभागापुढे आहे.
अकोला : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन तर राज्यात संचारबंदी लागू झाली. त्या काळात म्हणजेच २२ ते ३० मार्च या कालावधीत देशभरातून अकोला जिल्ह्यात १७२३३ प्रवासी दाखल झाले. त्यापैकी ९९ टक्के प्रवाशांची आरोग्य तपासणी ग्रामीण भागातील केंद्रांमध्ये करण्यात आली. त्यापैकी ६०३ व्यक्तींना क्वारंटीन करण्यात आले, तर आरोग्यविषयक तक्रारींमुळे १७३ जणांना पुढील संदर्भसेवेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. जिल्ह्यातील प्रवाशांची ही संख्या पाहता तसेच प्रत्येक गावात ते दाखल झाल्याने कोरोनाचा प्रसार रोखण्याचे मोठे आव्हान आरोग्य विभागापुढे आहे.
जिल्ह्यातील हजारो लोक कामानिमित्त देश, राज्यातील विविध शहरांमध्ये होती. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन झाले. राज्यात संचारबंदीही लागू झाली. या परिस्थितीत आहे त्या ठिकाणी न राहता हजारो लोकांनी जिल्ह्यातील मूळ गावाकडे धाव घेतली. त्यातून कोरोना प्रसाराचा धोका आणखीच वाढत गेला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक, वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयी ठेवत त्यांची आरोग्य तपासणी केली. त्यामध्ये २२ मार्चपासून दैनंदिन येणाºया प्रवाशांचीही तपासणी करण्यात आली. ३० मार्चपर्यंत दाखल झालेल्यांपैकी सर्वांची तपासणी करण्यात आली.
त्यामध्ये पुढील उपचाराची गरज असलेल्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले. त्यांची सख्याही बरीच आहे, तसेच १४ दिवसांपर्यंत केलेल्यांची संख्या ६०३ एवढी आहे. त्यांच्या विलगीकरणाचा काळ ३० मार्च संपुष्टात आला आहे. या प्रवाशांकडून कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता असल्याने आरोग्य विभागाने ही खबरदारी घेतली.