जिल्ह्यात १०२ ग्रामपंचायती इमारतीविना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:16 AM2021-01-18T04:16:52+5:302021-01-18T04:16:52+5:30
अकोला: जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींपैकी १०२ ग्रामपंचायतींच्या कार्यालयांसाठी अद्याप इमारती उपलब्ध नसल्याने, इमारतीविना कारभार सुरु असलेल्या ग्रामपंचायतींना ग्रामपंचायत भवन इमारती ...
अकोला: जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींपैकी १०२ ग्रामपंचायतींच्या कार्यालयांसाठी अद्याप इमारती उपलब्ध नसल्याने, इमारतीविना कारभार सुरु असलेल्या ग्रामपंचायतींना ग्रामपंचायत भवन इमारती उपलब्ध करुन देण्याच्या कामाकडे जिल्हा परिषदकडून कानाडोळा करण्यात येत असल्याचे वास्तव आहे.
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत (सर्वसाधारण ) ग्रामपंचायत भवन इमारतींच्या बांधकामांसाठी निधी उपलब्ध होतो. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत दरवर्षी उपलब्ध होणाऱ्या निधीतून ग्रामपंचायत भवन इमारतींची बांधकामे प्रस्तावित करणे आवश्यक आहे. जिल्हयातील ५३५ ग्रामपंचायतींपैकी १०२ ग्रामपंचायतींसाठी सद्यस्थितीत ग्रामपंचायत भवन इमारती नाहीत. इमारत उपलब्ध नसलेल्या या ग्रामपंचायतींचा कारभार तात्पुरत्या स्वरुपात गावांतील अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळांच्या खोलीत सुरु आहे. इमारतींविना सुरु असलेल्या जिल्ह्यातील संबंधित ग्रामपंचायतींना ग्रामपंचायत भवन इमारती उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा परिषदमार्फत ग्रामपंचायत भवन इमारतींची बांधकामे अद्याप प्रस्तावित करण्यात आली नाही. त्यामुळे इमारतीविना कारभार सुरु असलेल्या जिल्ह्यातील १०२ ग्रामपंचायतींना ग्रामपंचायत भवन इमारती उपलब्ध करुन देण्याच्या कामाकडे जिल्हा परिषदकडून कानाडोळा करण्यात येत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत उपलब्ध होणाऱ्या निधीतून इमारत उपलब्ध नसलेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी ग्रामपंचायत भवन उपलब्ध करुन देण्याचे नियोजन जिल्हा परिषदकडून केव्हा करण्यात येणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पदाधिकारी,सदस्यांकडून
निधीची मागणीच नाही!
ग्रामपंचायत इमारत उपलब्ध नसलेल्या ग्रामपंचायतींसाठी इमारत बांधकामांसाठी निधी उपलब्ध करण्यासंदर्भात संबंधित सर्कलमधील जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांकडून निधीची मागणी होणे अपेक्षित आहे. परंतू ग्रामपंचायत भवन इमारतींच्या बांधकामांसाठी जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांकडून जिल्हा परिषद प्रशासनाकडे निधीची मागणी अद्याप करण्यात आली नाही.