बाश्रीटाकळी तालुक्यातील २४ ग्रामपंचायती इमारतीविना
By admin | Published: December 29, 2014 12:56 AM2014-12-29T00:56:33+5:302014-12-29T00:56:33+5:30
सरपंच, उपसरपंचांच्या घरातून चालतो कारभार.
बबन इंगळे / सायखेड (बार्शिटाकळी, जि. अकोला)
ग्रामपंचायती हा पंचायत राज व्यवस्थेचा पाया मानल्या जातात. गावाचा कारभार पाहण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाची गरज असते; परंतु बाश्रीटाकळी तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींच्या इमारती मोडकळीस आल्या असल्याने या गावांचा कारभार सरपंच, उपसरपंचांच्या घरून किंवा जि.प. शाळांमधून चालतो.
बाश्रीटाकळी तालुक्यात एकूण १५९ गावे आणि ८३ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी सुकळी, चोहोगाव, साखरविरा, टिटवा, कातखेड, चिंचोली (रुद्रायणी), पार्डी, परंडा, साल्पी, पाराभवानी, पिंपळगाव हांडे, मांगूळ, जलालाबाद, खांबोरा, साहित, महागाव, टेंभी, देवदरी, धानोरा, हातोला, शेलू बु., वडगाव, बोरमळी, वाघजाळी या गावांमध्ये ग्रामपंचायतींचे कार्यालय क्षतिग्रस्त झाले आहेत.
यापैकी काही ग्रामपंचायतींच्या ओस पडलेल्या इमारतींमध्ये मोकाट जनावरांचा वावर असतो. त्यामुळे या गावांचा कारभार सरपंच, उपसरपंच यांच्या घरून किंवा जिल्हा परिषद शाळा, गावातील पार, सामाजिक सभागृह आदी ठिकाणांहून चालत असल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायतमधील नोंदणीकृत रेकॉर्ड सरपंच किंवा कोतवालाच्या घरी ठेवावे लागतात. ग्रामसेवक आले, तर त्यांना सरपंच, उपसरपंच किंवा सदस्यांच्या घरी बसून कामे उरकावी लागतात. शासनस्तरावर निधी प्राप्त न झाल्याने या गावांमध्ये ग्रामपंचायतीसाठी नव्या इमारती उभारण्याचे काम अद्यापपर्यंत सुरू होऊ शकले नाही. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन इमारत बांधणीसाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी होत आहे.
तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या इमारत बांधणीसाठी निधी प्राप्त झाला असून, बांधकाम सुरू आहे. उर्वरित ग्रामपंचायतींसाठी अद्याप निधी उपलब्ध झाला नसल्याने पुढील उपाययोजना तेथे आखण्यात आलेल्या नसल्याचे बाश्रीटाकळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी. एस. पाचपाटील यांनी व्यक्त केले आहे.