प्राण्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास न करताच विकास, सोहोळ अभयारण्याचा -हास
By admin | Published: December 26, 2015 02:34 AM2015-12-26T02:34:12+5:302015-12-26T02:34:12+5:30
गवताळ भागात लावली झाडे; हरणांनी सोडले अभयारण्य
विवेक चांदूरकर/ वाशिम: हरीण तसेच काळविटांच्या जीवनशैलीचा कोणत्याही प्रकारे अभ्यास न करता वन विभागाने सोहोळ अभयारण्याचा चुकीच्या पद्धतीने विकास केला. परिणामी या अभयारण्यातून हरीण व काळवीट बाहेर पडत असून, ते शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान करीत असल्याचा गंभीर प्रकार निदर्शनास येत आहे. जिल्हय़ात काळवीट तसेच हरणांचे वास्तव्य असलेले सोहळ अभयारण्य आहे. हे अभयारण्य गवताळ असून, १८३५ हेक्टरवर पसरले आहे. या अभयारण्यात काळवीट तसेच हरणांचा वावर मोठय़ा प्रमाणात असतो. सोहोळ हे देशात मोजक्या असलेल्या गवताळ अभयारण्यांपैकी एक आहे. मोठ-मोठय़ा वृक्षांनी नटलेल्या अभयारण्यांप्रमाणेच गवताळ अभयारण्याचीही एक वेगळी व समृद्ध अशी जैवविविधता असते; मात्र या भागाकडे नेहमीच पडीक जमीन म्हणून बघितले जाते. कारंजा-सोहोळ अभयारण्याचेही तेच झाले आहे. वन विभागाने या गवताळ प्रदेशात चुकीच्या पद्धतीने विकासकामे केली, तसेच येथे मोठ-मोठय़ा वृक्षांचे रोपण करण्यात आले. त्यांना नियमित पाणी दिल्याने येथे ही झाडे वाढली व येथे जंगल तयार झाले. तसेच या ठिकाणी मोठमोठी झुडुपेही तयार झाली आहेत. ही झुडुपे असलेले जंगल तयार झाल्यामुळे हरणांनी या ठिकाणी चरणे बंद केले. ज्या काळविटांच्या नावाने हे जंगल ओळखले जात होते, तेच प्राणी आता या जंगलात राहिले नाहीत. हरीण चरत असताना वाघ, बिबटसारखा हिंस्र पशूपासून नेहमी दक्ष असते. त्यामुळे ते वारंवार मान वर करून आजूबाजूला पाहत असते. दूर असलेला शिकारी प्राणी दिसावा याकरिता हरणे मोकळ्या जागेत चरणे पसंत करतात. सोहोळ हे गवताळ जंगल असल्यामुळे येथे हरणे मोठय़ा प्रमाणात चरत होती. आता मोठी झाडे वाढल्यामुळे वन्य प्राणी या जंगलात वास्तव्य करीत नसल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी तसेच केंद्रीय पर्यावरण समितीचे सदस्य राहिलेले डॉ. किशोर रिठे यांनी केला आहे. वन्य प्राण्यांसाठी असलेले हे जंगल वन विभागाच्या चुकीमुळे नष्ट झाले असून, येथे आता मोठे वृक्ष व झुडुपे उभी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सोहोळ अभयारण्यास वन विभागाच्या वतीने अतिरिक्त संरक्षण देण्यात आले आहे. तसेच येथे मोठ-मोठी झाडे लावण्यात आली आहे. हा गवताळ प्रदेश आहे. येथे हरीण व काळविटांची संख्या मोठय़ा प्रमाणात होती. आता मात्र झाडे वाढल्यामुळे हरणांनी हे अभयारण्य सोडले असून, ते आजूबाजूच्या गावांमधील शेतांमध्ये चरतात. याला वन विभागच जबाबदार असल्याचा ठपका पर्यावरणप्रेमी किशोर रिठे यांनी व्यक्त केले. तर या अभयारण्यात कमी प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे. त्यापैकी काही झाडे जगली नाहीत. त्यामुळे येथे जंगल तयार झाले नाही, तसेच या अभयारण्यातील वन्य प्राण्यांची संख्या वाढली असल्याचे कारंजा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी यू. ए. पठाण यांनी मत व्यक्त केले.