‘१९७१’च्या भारत-पाक युद्धाचा साक्षीदार अकोल्यातील अंदुरा गावात!

By atul.jaiswal | Published: December 16, 2017 01:16 PM2017-12-16T13:16:19+5:302017-12-16T13:21:50+5:30

अकोला : भारत-पाक युद्धात प्रत्यक्ष रणांगणावर लढलेला सैनिक अकोल्या जिल्ह्यातील अंदुरा येथे आहे. या युद्धास १६ डिसेंबर रोजी ४५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पूर्वसंध्येवर अंदुरा येथील माजी सैनिक नारायणराव साबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना युद्धाच्या स्मृतींना उजाळा दिला.

Witness of Indo-Pak war of '1971 'in Andorra village of Akola! | ‘१९७१’च्या भारत-पाक युद्धाचा साक्षीदार अकोल्यातील अंदुरा गावात!

‘१९७१’च्या भारत-पाक युद्धाचा साक्षीदार अकोल्यातील अंदुरा गावात!

Next
ठळक मुद्देभारत-पाकिस्तान युद्धाला १६ डिसेंबर रोजी झाली ४६ वर्षे पूर्ण. मराठा बटालियनचे माजी सैनिक नारायणराव साबळे यांनी जागविल्या आठवणी.सहकारी डोळ्यादेखत धारातिर्थी पडल्याचे आठवताच आजही पाणवतात डोळे.

- अतुल जयस्वाल
अकोला : तत्कालीन हिंदुस्थानातून वेगळ्या झालेल्या पाकिस्तानातील एक भाग असलेल्या पूर्व पाकिस्तानातील नागरिकांवर लष्कराकडून होत असलेला अत्याचार थांबविण्यासाठी सन १९७१ मध्ये भारताला हस्तक्षेप करावा लागला. बांगलादेश मुक्ती संग्रामाला पूर्णविराम देणाºया भारत-पाक युद्धात प्रत्यक्ष रणांगणावर लढलेला सैनिक अकोल्या जिल्ह्यातील अंदुरा येथे आहे. या युद्धास १६ डिसेंबर रोजी ४५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पूर्वसंध्येवर अंदुरा येथील माजी सैनिक नारायणराव साबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना युद्धाच्या स्मृतींना उजाळा दिला. युद्धाचे स्मरण झाले, की डोळ्यादेखत धारातीर्थी पडलेल्या सहकाºयांच्या आठवणीने आजही डोळे पाणवतात, अशा शब्दांत साबळे यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
ब्रिटिशांनी हिंदुस्थानातून काढता पाय घेताना या देशाचे भारत आणि पाकिस्तान असे दोन तुकडे केले. भारताचा वायव्येकडील भूभाग आणि पूर्वेकडील भूभाग मिळून पाकिस्तानची निर्मिती करण्यात आली. सत्तेचे केंद्र पश्चिम पाकिस्तानात असल्याने पूर्व पाकिस्तानकडे दुर्लक्ष होऊ लागले तसेच लष्करी सरकारकडून पूर्व पाकिस्तानाती नागरिकांवर अत्याचार होऊ लागले. पाकिस्तानपासून वेगळे होण्यासाठी पूर्व पाकिस्तानात बांगलादेश मुक्ती संग्रामास सुरुवात झाली. भारताच्या त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या स्वतंत्र संग्रामास पाठिंबा दिला. पाकिस्तानी लष्कराचे अत्याचार वाढल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारले आणि ३ डिसेंबर रोजी युद्धाला तोंड फुटले. या युद्धात मराठा बटालियनचे सैनिक अंदुरा येथील नारायणराव साबळे सहभागी होते. या युद्धात पहिल्याच दिवसापासून भारतीय सैनिक पाकिस्तानी लष्करावर वरचढ ठरले. पाकिस्तानी सैन्याने १५ डिसेंबरपर्यंत प्रतिकार केला; परंतु त्यांचा निभाव न लागल्यामुळे १६ डिसेंबर रोजी भारत-पाकमध्ये सिमला करार होऊन युद्ध संपुष्टात आले. करारानुसार भारताच्या ताब्यातील ९० हजारांहून अधिक पाकिस्तानी सैनिक व नागरिकांना मुक्त करण्यात आले. युद्धात भारताचे ३ हजार ८४३ सैनिक शहीद झाले होते. यामध्ये नारायणराव साबळे यांचे सहकारी नारायण फाळके, यशवंत पवार, लक्ष्मण राणे, प्रभाकर काटकर, गजानन चव्हाण, तयप्पा नरवाडे, पी. एस. पाटील, दत्ता दळवी, मारोती जाधव आणि अशोक यादव यांना वीरमरण आले. डोळ्यादेखत सहकाºयांचा झालेला मृत्यू आणि मृतदेहांचा पडलेला खच पाहून आजही डोळे पाणवतात. त्यावेळी युद्धामुळे पूर्व पाकिस्तानातील नागरिकांना स्वातंत्र्य मिळून बांगलादेशची निर्मिती झाली असली, तरी युद्धातून झालेली हानी अपरिमित होती, असे नारायणराव साबळे सांगतात.

 

Web Title: Witness of Indo-Pak war of '1971 'in Andorra village of Akola!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.