मेळघाटमधून अकोट तालुक्यात पुनर्वसित गावात अल्पवयीन मुलीसह महिलेचा अज्ञात तापाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 05:39 PM2018-06-07T17:39:19+5:302018-06-07T17:39:19+5:30
अकोट : मेळघाटमधून अकोट तालुक्यात पुनर्वसित झालेल्या बारूखेडा या गावात एका अल्पवयीन मुलीसह महिलेचा अज्ञात तापाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २५ मे ते २ जूनच्या दरम्यान घडली आहे.
- विजय शिंदे
अकोट : मेळघाटमधून अकोट तालुक्यात पुनर्वसित झालेल्या बारूखेडा या गावात एका अल्पवयीन मुलीसह महिलेचा अज्ञात तापाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २५ मे ते २ जूनच्या दरम्यान घडली आहे. या घटनेमुळे या पुनर्वसित आदिवासींना विविध मूलभूत सुविधा देण्यासह आरोग्य सेवा देण्याकडे आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात मेळघाटातील आदिवासीची आठ गावे गेल्यामुळे शासनाने या गावांमधील आदिवासींचे सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी अकोट तालुक्यात पुर्नवसन करण्यात आले. या गावापैंकी बारूखेडा येथील १३ वर्षाची आरती अमर जामूनकर व ३७ वर्षे वयाच्या लीला शामलाल कासदेकर या दोंघीचा २५ मे ते २ जून दरम्यान अज्ञात आजार होऊन तापाने मृत्यु झाल्याची घटना घडली . ही घटना घडुनही आरोग्य यंत्रणा जागृत झालीच नाही. यापूर्वीदेखील अनेक आदिवासींचा येथे विविध आजारांनी मृत्यू झाल्याने व मूलभूत सुविधा मिळाल्या नसल्याने या पुनर्वसित गावातील आदिवासींनी मेळघाटात परतण्याचा नारा दिला होता. त्यानंतर ते आदिवासी पुन्हा मेळघाटातील जुन्या गावात गेले होते. यावेळी ग्रामस्थांनी आंदोलन केल्यामुळे त्यांच्या अनेक समस्या मार्गी लावल्या असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला होता. पंरतु अल्पवयीन मुलीसह महिलेचा मृत्यु झाल्याने प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. अद्यापही या आदिवासी ग्रामस्थांना पुरेशा आरोग्य सुविधा मिळत नसल्याचे दिसत आहे. आदीवासीच्या आरोग्य सेवा-सूविधा देण्याकरीता शासन विविध योजना व लाखो रूपयांचा निधी खर्च करते. परंंतु, या गावातील आरोग्याची समस्या कायमच असून पावसाळ्यात अधिक रोगराई पसरून आदिवासीच्या जीवावर उठू नये याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. पुरेसे पोषक धान्य व उपचाराचा अभावाने हे बळी गेल्याची माहिती डिंगाबर सोंळके या गावकऱ्याने दिली.
लिलाबाई कासदेकर हिला रुग्णालयात आणतांना रक्ताची उलटी होऊन वाटेतच मृत्यू झाला.तसेच आरती जांमुनकर हीचा मृत्यु झाला आहे.मृत्यु कशामुळे झाला याचे अचुक निदान होऊ शकले नाही . आरोग्य यंत्रणा तपास करीत आहे.
-डॉ.अनिरूध्द वेते,वैद्यकीय अधिकारी,प्रा.आ.केंद्र दानापूर
गावातील आरती अमर जमुनकर हिचा आजाराने मृत्यु झाला.तसेच लीला शामलाल कसदेकर या महीलेला अचानक रक्ताच्या उलटी झाल्याने मृत्यु झाला. या गावात दानापुर येथील डॉक्टर आठवड्यातून एकदा येतात. -जया गजानन पाठक
सरपंच, बारूखेडा