महिलेचा मृत्यू; नातेवाईक संतप्त
By admin | Published: July 3, 2017 01:47 AM2017-07-03T01:47:15+5:302017-07-03T01:47:15+5:30
पोलिसांची मध्यस्थी: शस्त्रक्रियेसाठी घेतलेले अडीच लाख परत मागण्यासाठी वादंग
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोट येथील इफ्तिखार नगरातील महिलेचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी दुपारी मृत्यू झाला. महिलेच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी घेतलेले अडीच लाख रुपये डॉक्टरांनी परत करावे, यासाठी मृतक महिलेच्या कुटुंबीय व नातेवाइकांनी संताप व्यक्त करीत हैदोस घातला आणि रुग्णालयात शिवीगाळ करीत तेथील कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला. यावेळी रामदासपेठ पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून मध्यस्थी केल्याने वाद निवळला.
अकोट येथील शाहनाज खातून अली खान (३८) हिचे डोके दुखत असल्याने, तिला रविवारी भागवत प्लॉटमधील खासगी रुग्णालयात भरती केले.
या ठिकाणी महिलेच्या चाचण्या करण्यात आल्या. चाचणीदरम्यान डॉक्टरांनी महिलेला ब्रेन ट्युमरचा आजार असल्याचे निदान केले आणि शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे स्पष्ट करीत अडीच लाख रुपये खर्च असल्याचे कुटुंबीयांना सांगितले. दरम्यान, महिलेच्या कुटुंबीयांनी शहरातील आणखी एका खासगी डॉक्टरला तिचा आरोग्य अहवाल दाखविला.
या खासगी डॉक्टरने तिला ब्रेन ट्युमर नसून, तिच्या डोक्यात कर्करोगाची गाठ झाल्याचे सांगत, तिच्यावर शस्त्रक्रिया करणे धोकादायक असल्याचे कुटुंबीयांना सांगितले; परंतु महिलेच्या कुटुंबीयांनी तिच्या शस्त्रक्रियेसाठी अडीच लाख रुग्णालय प्रशासनाकडे जमा केले. महिलेवर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला, त्यामुळे कुटुंबीय व महिलेच्या नातेवाइकांनी शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांनी घेतलेले अडीच लाख परत द्यावे, यासाठी रुग्णालयात हैदोस घातला आणि तेथील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत वाद घातला. घटनेची माहिती रामदासपेठचे ठाणेदार शैलेश सपकाळ यांना मिळताच, ते पोलीस कर्मचाऱ्यासह रुग्णालयात पोहोचले. या ठिकाणी त्यांनी कुटुंबीय व नातेवाइकांची समजूत घातली. अखेर कुटुंबीयांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला.