पिंजर येथील महिलेचा सर्पदंशाने मृत्यू
By admin | Published: April 3, 2017 02:54 AM2017-04-03T02:54:46+5:302017-04-03T02:54:46+5:30
उपचारास विलंब झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप.
पिंजर (अकोला), दि. २- येथील सरस्वतीबाई लहाने नगरमधील रहिवासी असलेल्या चित्रा ऊर्फ आरती दीपक गावंडे यांचा राहत्या घरात सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री १२ वाजता घडली.
येथून जवळच असलेल्या भेंडगाव येथील मूळ रहिवासी असलेले दीपक गावंडे हे टेलरिंग व्यवसाय करतात. त्यांच्या पत्नी व ते स्वाध्याय परिवाराशी जुळलेले असल्याने ते उमरदरी येथून स्वाध्याय परिवाराचे कार्य आटोपल्यावर रात्री पिंजर येथील घरी परतले.
रात्री १२ वाजता निद्रावस्थेत असताना आरती गावंडे यांना सापाने दंश केला. ही बाब दीपक गावंडे यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने आरती यांना शेजार्यांच्या मदतीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले; परंतु उपस्थित वैद्यकीय अधिकारी यांनी तातडीने उपचार न केल्यानेच आरती यांचा मृत्यू झाल्याचा आरोप गावंडे परिवाराने केला आहे. आरती यांना दोन चिमुकल्या मुली आहेत. आरती यांच्या मृत्यूमुळे चिमुकल्या मुलींचे मातृत्व हरविल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, उपस्थित वैद्यकीय अधिकार्याने सर्पदंशाने इजेक्शन दिले नसल्याची माहिती आहे. प्राथमिक उपचार करण्यास विलंब केल्याने मृतक महिलेच्या सासर्यांनी अंतविधीला उपस्थित असलेल्या आमदार हरीश पिंपळे यांना सांगितले. यावेळी आमदार पिंपळे यांनी चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.