शेतात कामासाठी गेलेल्या महिलेचा सर्पदंशाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 04:07 PM2020-09-08T16:07:41+5:302020-09-08T16:07:49+5:30
चंद्रप्रभा भास्कर आकोत (५०) यांचा सर्पदंशाने सोमवारी सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अकोला : बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंदखेड येथील रहिवासी चंद्रप्रभा भास्कर आकोत (५०) यांचा सर्पदंशाने सोमवारी सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांची उत्तरीय तपासणी करण्यात आली असून, यामध्ये सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे समोर आल्याची माहिती आहे. त्यामुळे कृषी विभाग तसेच वन विभागाने तातडीने मदत करण्याची मागणी आकोत यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
सिंदखेड येथील रहिवासी चंद्रप्रभा भास्कर आकोत व त्यांचे पती भास्कर महादेव आकोत हे पती-पत्नी सोमवारी त्यांच्या शेतात कामासाठी गेले होते. या दरम्यान गवतातील सापाने चंद्रप्रभा भास्कर आकोत यांना दंश केला. विषारी साप असल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली. ग्रामस्थांसह येथील डॉक्टरांनी शेतकरी महिलेला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. प्रशासनानेही त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले; मात्र उपचार सुरू असतानाच शरीरात सापाचे विषाचा फैलाव झाल्याने त्यांचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. तर आकोत कुटुंबीयांनी कृषी विभाग तसेच वन विभागाकडून तातडीने मदत मिळावी, अशी मागणी केली आहे.