नॉयलॉन मांजात अडकल्याने कापला महिलेचा पाय; करावी लागली शस्त्रक्रिया
By Atul.jaiswal | Published: December 7, 2023 04:40 PM2023-12-07T16:40:46+5:302023-12-07T16:41:08+5:30
मांजामुळे महिलेच्या पायाला खोलवर जखम झाली असून, त्यावर शस्त्रक्रिया करावी लागली आहे.
अकोला : बंदी असतानाही शहरात नॉयलॉन मांजाची खुलेआम विक्री होत असून, रस्त्यावर पडलेल्या मांजात पाय अडकून एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना गीता नगर परिसरात मंगळवारी सायंकाळी घडल्याचे समोर आले आहे. मांजामुळे महिलेच्या पायाला खोलवर जखम झाली असून, त्यावर शस्त्रक्रिया करावी लागली आहे.
स्थानिक गीता नगर परिसरातील महेश कॉलनी येथे राहणाऱ्या नीता काबरा (५०) या मंगळवारी सायंकाळी शिकवणी वर्गाला गेलेल्या त्यांच्या नातीला घरी आणण्यासाठी जात होत्या. गीता नगरातील मुख्य रस्त्या पार करत असताना रस्त्याच्याकडेला पडलेल्या नॉयलॉन मांजात त्यांचा डावा पाय अडकला. त्याचवेळी तेथून जात असलेल्या दुचाकीत या मांजाची दुसरी बाजू अडकली.
दुचाकीमुळे मांजा खेचल्या गेल्याने त्यांच्या पायाला जोरदार हिसका बसला व खोलवर जखम होऊन नस कापल्या गेल्या. यावेळी तेथून जात असलेल्या सामाजिक कार्यकर्ते राम बाहेती व इतर नागरिकांनी त्यांची मदत करत त्यांचा पाय मांजाच्या फासातून सोडवला. तोवर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्या पायाच्या जखमेवर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली.