विवाहितेची आत्महत्या, पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 10:49 AM2020-11-20T10:49:11+5:302020-11-20T10:49:40+5:30
उरळ पोलिसांनी निंबा येथील पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
उरळ: माहेराहून कार घेण्यासाठी तीन लाख रुपये आण, यासाठी तगादा लावून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. या छळाला कंटाळून विवाहितेने १९ नोव्हेेंबर रोजी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी उरळ पोलिसांनी निंबा येथील पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. नाशिक जिल्ह्यातील अंबड येथे राहणारे भारत केशव वाकोडे(४८) यांच्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी पुनम सुबोध तायडे(२३) हिचे लग्न एका महिन्यापूर्वी रितीरिवाजाप्रमाणे झाले. लग्नानंतर आरोपी पती सुबोध सुरेश तायडे, सासरा सुरेश सखाराम तायडे, सासू सूर्यकांत सुरेश तायडे, नणंद मोहिनी ऊर्फ मोन्टी सुरेश तायडे, राणी आकाश ससाने आदींनी पुनमला कार घेण्यासाठी माहेराहून तीन लाख रुपयांचा तगादा लावला. पूनमने नकार दिल्याने, सासरच्या लोकांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. या छळाला कंटाळून पुनमने घरात गळफास घेऊन १९ नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली. भारत वाकोडे यांच्या तक्रारीनुसार उरळ पोलिसांनी पाच आरोपींविरुद्ध भादंवि कलम ४९८ अ, ३०४ ब नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी पती व सासऱ्यास अटक केली आहे. पुढील ठाणेदार अनंत वडतकार, जमादार सुलताने, फाळके करीत आहेत.