कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया बेतली महिलेच्या जीवावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 02:15 PM2019-02-23T14:15:32+5:302019-02-23T15:10:46+5:30
अकोला: कुटुंब नियोजन योजनेंतर्गत मुंडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाथर्डी (ता. तेल्हारा) येथील महिलेची शस्त्रक्रिया करण्यात आली; पण ही शस्त्रक्रिया त्या महिलेच्या जीवावर चांगलीच बेतली असून, सध्या या महिलेवर मुंबई स्थित जे.जे. इस्पितळात उपचार सुरू आहेत.
अकोला: कुटुंब नियोजन योजनेंतर्गत मुंडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाथर्डी (ता. तेल्हारा) येथील महिलेची शस्त्रक्रिया करण्यात आली; पण ही शस्त्रक्रिया त्या महिलेच्या जीवावर चांगलीच बेतली असून, सध्या या महिलेवर मुंबई स्थित जे.जे. इस्पितळात उपचार सुरू आहेत. या प्रकाराला प्राथमिक आरोग्य केंद्रावरील डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप महिलेच्या पतीने केला.
प्राप्त माहितीनुसार, मुंडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पाथर्डी (ता. तेल्हारा) येथील रहिवासी मीना संतोष नावकार यांना कुटुंब नियोजन कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रियेसाठी तयार करण्यात आले. त्यानुसार, २४ जानेवारी रोजी त्यांच्यावर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया करण्यात आली. सहा दिवसांनी टाके काढण्यासाठी त्या पीएससीमध्ये गेल्या. त्यावेळी डॉक्टरांना त्यांच्या पोटावर सूज असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी ३० जानेवारी रोजी महिलेला तत्काळ सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी ड्रेसिंग काढताच पोटाची त्वचा निघाली. हे दृश्य पाहून डॉक्टरही थक्क झाले. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार महिलेला खासगी रुग्णालयात हलविले. उपचारादरम्यान महिलेची प्रकृती गंभीर झाल्याने २१ फेब्रुवारी रोजी त्यांना मुंबईतील जे.जे. इस्पितळात दाखल करण्यात आले; पण त्या ठिकाणी महिलेच्या पोटावरील ड्रेसिंग उघडताच परिस्थिती आणखी चिंताजनक झाल्याची माहिती महिलेच्या पतीने दिली.
‘इन्फेक्शन’मुळे हा प्रकार झाल्याची माहिती
याप्रकरणी सर्वोपचारमधील तज्ज्ञ परिचारिकेसोबत संवाद साधला असता, हा प्रकार इन्फेक्शनमुळे होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती त्यांनी दिली. चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया किंवा शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचा निष्काळजीपणा यामुळे इन्फेक्शन झाल्याचा प्रकार झाल्याची माहिती त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
माझ्या पत्नीला कुठलाच आजार नव्हता. तिला कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले. त्या ठिकाणी डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे माझ्या पत्नीला नरकयातना भोगाव्या लागत आहेत.
- संतोष नावकार, रुग्ण महिलेचे पती.
शस्त्रक्रियेच्या तीन दिवसांनंतर महिलेच्या पोटात दुखते म्हणून ती प्राथमिक आरोग्य केंद्रात आली होती. तपासणीदरम्यान शस्त्रक्रियेची त्वचा लाल झाल्याचे दिसून आले. त्यामुळे वेळीच त्या रुग्णाला सर्वोपचारमध्ये दाखल केले. पुढील उपचार सर्वोपचार रुग्णालयात झाला. त्या महिलेसोबतच इतर १० महिलांवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती उत्तम आहे.
- डॉ. एस. एस. भिरडे, प्राथमिक आरोग्य केंद्र, मुंडगाव.